जत नगरपरिषदेला मिळणार सुसज्ज इमारत
जत : जत नगरपरिषदच्या नूतन इमारतीसाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. अनेक वर्षांपासून इमारत बांधकामासाठीचा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे जतला सुसज्ज व देखणी इमारत मिळणार असल्याने आ. पडळकर यांचे विशेष कौतुक होत आहे.
नगरपरिषद नूतन इमारतीसाठी तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी २०१६-१७ मध्ये पहिला प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता. मात्र, जागेअभावी मंजुरी दिली गेली नव्हती. यानंतर बरेच वर्षे नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत होती. दरम्यान, आ. गोपीचंद पडळकर यांनी मुख्याधिकारी राठोड यांना तात्काळ नूतन इमारतीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले होते.
यावर आ. पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत नगरपरिषदेला नूतन इमारतीला मंजूरी देण्यासाठी पाठपुरावा केला होता. यावर विभागाने सोमवारी २० ऑक्टोबर रोजी जत नगरपरिषदला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटींचा निधी मंजूर केला असून याबाबत राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी भूषण गायकवाड यांच्या सहीने शासन आदेश जाहीर केला आहे.
शिवाय, सांगलीच्या जिल्हाधिकारी यांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे. त्यामुळे जत शहरात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत आ. पडळकर यांचे कौतुक होत आहे.
शहराच्या वैभवात भर पडेल : आ. पडळकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने राज्यात जत तालुका हा माझ्यासाठी पाहिला असेल असे अभिवचन दिले होते. शिवाय, जतच्या जनतेने विकासासाठी माझ्यावर मोठ्या संख्येने विश्वास दाखवला. जत शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या काम प्रगतीपथावर सुरू आहेच. आता नूतन इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे, असे आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.








