वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या पाठदुखापतीवर न्यूझीलंडमध्ये तज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला यापूर्वी होत असलेल्या वेदना थांबल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याचप्रमाणे आता भारतीय संघातील फलंदाज श्रेयस अय्यर याच्यावरही तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात केली जाणार असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियात 2022 साली झालेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून बुमराहला या पाठदुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते. भारतामध्ये त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय इलाज सुरू होता. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. न्यूझीलंडमधील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर आता बुमराहला बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीसाठी पुनर्वसनासाठी रहावे लागणार आहे. मात्र, तो पूर्णपणे बरा होण्यासाठी बीसीसीआयची अट राहील. लवकरच या अकादमीमध्ये तो आणखी काही दिवसांनंतर नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करेल. पण त्याला पुन्हा संघात प्रवेश देण्यासाठी बीसीसीआयकडून घाई केली जाणार नाही, असेही सांगण्यात आले. गेल्या ऑगस्टमध्ये बुमराहला या दुखापतीची जाणीव झाली. त्यामुळे तो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकला नाही. या दुखापतीचे स्वरुप गंभीर नसल्याने त्याचा ऑस्ट्रेलियातील झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धचे दोन सामने 23 आणि 25 सप्टेंबर रोजी खेळले होते. भारतीय संघातील फलंदाज श्रेयस अय्यरलाही पाठदुखापतीची समस्या प्रखरतेने जाणवत असल्याने त्याच्यावर यापूर्वी वैद्यकीय इलाज सातत्याने सुरू होता. पण त्याच्या दुखापतीमध्ये कोणताही फरक न पडल्याने त्याच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पुढील आठवड्यात श्रेयस अय्यरवर ही शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेनंतर अय्यरला दोन आठवड्यांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावे लागेल









