आयसीसी मानांकनात अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज
वृत्तसंस्था/ दुबई
जसप्रीत बुमराह हा विशाखापट्टणम येथील इंग्लंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर बुधवारी आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या 30 वर्षीय खेळाडूने सादर सामन्यात मिळविलेल्या नऊ बळींच्या जोरावर पॅट कमिन्स, कागिसो रबाडा आणि रविचंद्रन अश्विन यांना मागे टाकले असून तो पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा भारताचा फक्त चौथा खेळडू बनला आहे.
अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशनसिंग बेदी हे इतर भारतीय आहेत, जे सदर यादीच्या अग्रस्थानी पोहोचू शकले. भारताने 106 धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत ज्यातून बरोबरी साधली त्या दुसऱ्या कसोटीत सामनावीर म्हणून निवडण्यात आलेल्या बुमराहने अश्विनच्या 11 महिन्यांच्या राजवटीचा शेवट केला आहे. 499 कसोटी बळी मिळविलेला अश्विन आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
फलंदाजीच्या क्रमवारीत डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावातील शानदार द्विशतकाच्या जोरावर 37 स्थानांनी बढती मिळून 29 व्या स्थानावर पोहोचला आहे आणि शुभमन गिल दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्तम 38 व्या स्थानावर पोहोचला आहे. विशाखापट्टणम कसोटीनंतर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली हा आठ स्थानांनी प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 22 व्या स्थानावर पोहोचला आहे.
लेगस्पिनर रेहान अहमद 14 स्थानांनी प्रगती करत 70 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर आपल्या पहिल्या दोन कसोटीत प्रत्येकी किमान 50 धावा काढणारा आणि पाच बळी मिळविणारा इंग्लंडचा दुसर खेळाडू बनलेल्या टॉम हार्टलेनं दोन्ही यादींत प्रगती केली आहे. फलंदाजी क्रमवारीत तो 103 व्या स्थानावरून 95 व्या आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत 63 व्या स्थानावरून 53 व्या स्थानावर पोहोचला आहे. ताज्या क्रमवारीवर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात कोलंबो येथे झालेल्या एकमेव कसोटीतील कामगिरीचाही परिणाम झाला आहे. डावखुरा फिरकीपटू प्रभाथ जयसूर्या तीन स्थानांनी प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.









