आयसीसी पुरस्कार : बुमराहचा ‘मास्टर क्लास’ ठरला भारी, महिलांमध्ये न्यूझीलंडची मेली केर‘सर्वोत्तम’
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी क्रिकेटच्या विविध स्वरुपांत दाखविलेले कौशल्य, अचूकता आणि अथक सातत्य याचे प्रदर्शन त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरवून गेले असून ‘आयसीसी’ सर्वोत्तम पुऊष क्रिकेटपटूसाठीचा प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे. महिलांमध्ये न्यूझीलंडची मेली केर सर्वोत्तम पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
या 31 वर्षीय खेळाडूला सोमवारी आयसीसीचा गतवर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून गौरवण्यात आले. गेल्या आठवड्यात त्याला वर्षातील कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते. जसप्रीत बुमराहसाठी 2024 वर्ष असाधारण ठरून त्याने खेळाच्या सर्वांत मोठ्या व सर्वांत लहान स्वरुपातही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. त्याच्या या कामगिरीला मान्यता म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
बुमराहने भारतासाठी सर्व प्रकारांत महत्त्वाची भूमिका बजावलेली असून राहुल द्रविड (2004), सचिन तेंडुलकर (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2017 व 2018) यांच्यानंतर तो सदर पुरस्कार जिंकणारा देशाचा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीची चमक त्याच्या आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीतही प्रतिबिंबित झाली आहे. तिथे त्याने 900 गुणांचा विक्रमी टप्पा ओलांडला आणि वर्षाचा शेवट विक्रमी 907 गुणांसह केला. इतिहासातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा विचार करता हा गाठण्यात आलेला सर्वोच्च स्तर आहे, असे आयसीसीने नमूद केले आहे.
सर्व प्रकारांत बुमराहचे 2024 मधील कारनामे हे त्याचे कौशल्य, अचूकता आणि अथक सातत्याबरोबर त्याचा उत्कृष्ट दर्जा दाखविणारे होते. त्याने एकामागून एक विक्रम मोडीत काढले आणि जगातील प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून आपले स्थान पक्के केले, असेही आयसीसीने म्हटले आहे. बुमराहसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले गेले. याअंतर्गत त्याने अमेरिकेतील टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या मोहिमेत भारतातर्फे 15 बळी घेऊन निर्णायक भूमिका बजावली आणि 20 हून कमी सरासरीने 200 कसोटी बळींचा टप्पा सर्वांत वेगाने गाठणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनण्यात यश प्राप्त केले. त्याची ही सरासरी इतिहासातील सर्वोत्तम आहे.
‘मी या सन्मानाने खूप खूश आहे, पण माझे पाय जमिनीवर आहेत’, असे गुजरातच्या या गोलंदाजाने यासंदर्भात बोलताना एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे. संघाच्या यशाला नेहमीच आपले प्राधान्य असेल, असे त्याने म्हटले असून भारताच्या टी-20 विश्वचषक जेतेपदाला 2024 मधील आपला सर्वांत प्रिय क्षण म्हणून निवडले आहे.
न्यूझीलंडची मेली केर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
दुसरीकडे, न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू मेली केरच्या 2024 मधील जबरदस्त कामगिरीने ‘आयसीसी’ सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू किताब मिळवून इतिहास रचला आहे. 24 वर्षीय केरने लॉरा वोल्वार्ड, चमारी अटापटू आणि अॅनाबेल सदरलँड यांना मागे टाकून महिला क्रिकेटमधील हा सर्वोच्च सन्मान मिळवला. केर ही केवळ रॅचेल हेयो फ्लिंट ट्रॉफी जिंकणारी न्यूझीलंडची पहिली खेळाडूच नाही, तर कोणत्याही श्रेणीत वर्षाची सर्वोत्तम ‘आयसीसी’ महिला क्रिकेटपटू ठरलेली पहिली किवी खेळाडू देखील आहे. वर्षभरात केरने जागतिक दर्जाची अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ओळख आणखी बळकट बनविणारी कामगिरी केली.









