आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा : ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपद
, दिग्गज खेळाडूंना विश्रांती, युवा खेळाडूंकडे संघाची धुरा
वृत्तसंस्था/ मुंबई
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. आयर्लंड दौऱ्यासाटी जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपद असेल. या दौऱ्यासाठी सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. उभय संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरु होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यावर फक्त युवा खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडकडे दौऱ्यासाठी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंग, जितेश शर्मा यांना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. बुमराहशिवाय दुखापतीतून सावरणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचेही संघात पुनरागमन झाले आहे. तसेच दीर्घ काळानंतर शिवम दुबेचीही संघात वर्णी लागली आहे.
बुमराह प्रथमच टी-20 मध्ये कॅप्टन
जसप्रीत बुमराह प्रथमच टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने कसोटी सामन्यामध्ये भारताची कमान सांभाळली होती. बुमराहने भारताकडून शेवटचा सामना 11 महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळला होता. तो नुकताच दुखापतीतून सावरला आहे. बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याने फिटनेस टेस्ट दिल्यानंतर त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 20 ऑगस्ट रोजी तर तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. हे सर्व सामने डब्लिन येथे खेळवण्यात येतील. दरम्यान, आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यापासून सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.









