वृत्तसंस्था / लिव्हरपूल (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या जस्मिन लंबोरीया, नुपूर शेरॉन आणि मिनाक्षी हुडा यांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मात्र या स्पर्धेच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत पुरूष विभागात भारतीय मुष्टीयोद्धांना पदकविना मायदेशी परतावे लागत आहे.
महिलांच्या 57 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत भारताच्या जस्मिन लंबोरीयाने व्हेनेझुयेलाच्या ओमेलीन अल्केलाचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या 80 किलो वजन गटातील खेळविण्यात आलेल्या उपांत्य लढतीत भारताची हेवीवेट गटातील मुष्टीयोद्धी नुपूर शेरॉनने तुर्कीच्या सैमा डुझेटासचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर 48 किलो गटात भारताच्या मिनाक्षी हुडाने मंगोलियाच्या अल्टेनसिटसेगचा 5-0 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मिनाक्षीने आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तसेच विश्वचषक नेमबाजी मुष्टीयुद्ध स्पर्धैत यापूर्वी रौप्य पदके मिळविली आहेत. पुरूष विभागात मात्र भारताच्या एकही स्पर्धकाला पदक फेरी गाठता आली नाही. 2023 च्या ताश्कंद येथे झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या दीपक भोरीया, मोहम्मद हुसामुद्दीन आणि निशांत देव यांनी तीन कांस्यपदके मिळविली होती. पण यावेळी या स्पर्धेत भारतीय पुरूष मुष्टीयोद्धांनी साफ निराशा केली. लिव्हरपूलमधील स्पर्धेमध्ये आता महिलांच्या विभागात भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत.









