वृत्तसंस्था / ग्रेटर नोयडा
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आठव्या इलाईट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणारी भारताची महिला मुष्टीयुद्धी जस्मीन लंबोरीयाने आरएससीचे प्रतिनिधीत्व करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या फेरीतील लढतीत जस्मीन लंबोरीयाने चंदीगडच्या रुचिकाचा लाईटवेट गटात पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.
सदर स्पर्धा अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशन आणि उत्तर प्रदेश मुष्टीयुद्ध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शहीद विजयसिंग पठीक क्रीडा संकुलात सुरू आहे. सदर स्पर्धा 27 मार्चपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेत 24 राज्यांचे सुमारे 190 स्पर्धक सहभागी झाले आहेत. अन्य लढतीमध्ये रेल्वेच्या सनामाचा छानुने मणिपूरच्या बिंदीयादेवी मेरोमचा पराभव केला. तर बॅन्टमवेट गटात उत्तरप्रदेशच्या सोनियाने दिल्लीच्या वनशिखाचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. सिक्कीमच्या यासिका रायने महाराष्ट्राच्या जानव्ही चुरीचा पराभव केला. हरियाणाच्या तनुने मणिपूरच्या सोव्ही जेजोचा लाईटवेट गटात 4-1 अशा गुण फरकाने पराभव केला.
प्राथमिक फेरीमध्ये राजस्थानच्या वनशिखा सिंगने केरळच्या पी.आर. धन्यावर मात केली. अखिल पोलीस दलातील इमरोज खानने आंध्रप्रदेशच्या स्वप्नाचा पराभव केला. आता या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी टप्प्याला प्रारंभ होत आहे. नितू घंगासने मिनाक्षीचा पराभव केला. फिदरवेट गटातील विद्यमान सुवर्णपदक विजेती सोनिया लेथर या स्पर्धेत 57 ते 60 वजन गटातून आपला सहभाग दर्शविला आहे. तिची सुवर्णपदकासाठी लढत मोनिका बरोबर होईल.









