वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थायलंडमध्ये 24 मेपासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या मुष्टियुद्ध स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजन गटात परवीन हुडाच्या जागी जस्मिन लंबोरियाला संधी देण्यात आली आहे. भारताची महिला मुष्टियोद्धा परवीन हुडावर 22 महिन्यांसाठी वाडाने आंतरराष्ट्रीय निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे परवीनने मिळविलेला ऑलिम्पिक कोटा भारताला सोडावा लागला आहे. या कारणास्तव आता परवीनच्या जागी जस्मिनला ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये खेळविले जाणार आहे.
12 महिन्यांत तीन वेळा परवीनने आपला ठावठिकाणा सांगण्यात कुचराई केली होती. भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने आता थायलंडमध्ये 24 मेपासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीच्या दुसऱ्या पात्र फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजन गटात जस्मिन लंबोरियाला उतरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जस्मिनने 60 किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले होते. परवीन हुडावर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी उशिरा संपणार असल्याने तिला आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.









