वृत्तसंस्था/ ग्रेटर नोयडा
महिलांच्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत जस्मिन लंबोरिया आणि मनिषा मौन यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठली आहे.
सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारी तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जस्मिनने 60 किलो वजन गटात महाराष्ट्रच्या पूनम कैथवासचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या लढतीत जस्मिनच्या जबरदस्त ठोशावर पूनमच्या जबड्याला दुखापत झाल्याने पंचांनी ही लढत थांबवली. हिमाचलप्रदेशच्या मेनकादेवीने तामिळनाडूच्या पी. एस. गिरीजाचा 4-1 अशा गुण फरकाने पराभव करुन उपांत्यफेरी गाठली आहे. जस्मिन आणि मेनकादेवी यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.
2022 च्या विश्व महिलांच्या मुष्ठीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या हरियाणाऱ्या मनिषा मौनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मिझोरामच्या टी. सी. लालरेमुटीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. लाईटवेट गटातील लढतीत आता मनिषाची उपांत्य फेरीची लढत पंजाबच्या सिमरनजीत कौरशी होणार आहे. 66 किलो वजन गटात अरुंधती चौधरीने उपांत्य फेरी गाठताना पंजाबच्या कोमलप्रित कौरवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. तसेच 81 किलो वजन गटात स्वाती बोराने उपांत्य फेरी गाठली आहे.









