वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथील लोकोमोटीव्ह स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एएफसी महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या फेरीत गुरुवारी झालेल्या सामन्यात जपानच्या महिला फुटबॉल संघाने भारताचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
या सामन्यातील पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळ करत जपानला केवळ एकमेव गोल करण्याची संधी दिली होती. मध्यंतरापर्यंत जपानने भारतावर 1-0 अशी आघाडी घेतली होती पण त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात जपानच्या आघाडीफळीने भारताची बचावफळी पूर्णपणे भेदत 6 गोल नेंदवले. 17 व्या मिनिटाला जपानचे खाते नाकाशीमाने उघडले. सामन्याच्या उत्तरार्धात 11 मिनिटांच्या कालावधीत जपानने चार गोल केले. जपानच्या नाकाशीमाने संघाचा वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर हायाशीने जपानची आघाडी वाढवली. मिना तनाकाने जपानचा चौथा गोल हेडरद्वारे केला. मियाबी मोरियाने जपानचा पाचवा गोल नोंदवला. किको सेकी आणि नाओमोटो यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.









