वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे उपअर्थमंत्री केंजी कांडा यांनी राजीनामा दिला आहे. एका नियतकालिकाकडून कांडा यांच्या कंपनीने करभरणा केली नसल्याचे उघड केले होते. या पार्श्वभूमीवर कांडा यांना स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर या घडामोडींमुळे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना झटका बसला आहे.
जपानचे अर्थमंत्री शुनिची सुझुकी यांना कांडा यांनी स्वत:चा राजीनामा सोपविला आहे. सरकारकडून कांडा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. अचल संपत्तीवरील कर न भरलयाने 2013-22 दरम्यान 4 वेळा आपल्या कंपनीची जमीन आणि संपत्ती जप्त केली होती अशी कबुली कांडा यांनी दिली आहे. टॅक्स अकौंटंट्ससाठी अनिवार्य स्वरुपात असलेल्या वार्षिक व्याख्यानातही त्यांनी भाग घेतला नव्हता.
राष्ट्रीय राजकारणात व्यग्र असल्याने माझे टॅक्स अकौंटंटचे काम कमी झाले होते असा दावा कांडा यांनी केला आहे. तर विरोधी पक्षांनी कांडा यांना गुन्हेगार ठरविले आहे. कांडा यांनी स्वत:च्या आर्थिक गुन्ह्यासाठी माफी मागितली आहे. परंतु प्रारंभी त्यांनी उपअर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता.









