शुल्क करारावरून अखेरच्या क्षणी उच्चाधिकाऱ्याचा दौरा रद्द
वृत्तसंस्था/टोकियो
जपानच्या वरिष्ठ व्यापारविषयक प्रतिनिधीने अखेरच्या मिनिटांमध्ये अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे. प्रशासकीय समस्यांमुळे होत असलेल्या विलंबानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे चीननंतर जपानने देखील अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. जपानचे वरिष्ठ व्यापारविषयक प्रतिनिधी रयोसेई अकाजावा यांचा हा दौरा 550 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक पॅकेजला अंतिम स्वरुप देण्यासाठी होणार होता, हे पॅकेज जपानने अमेरिकेकडून शुल्कात मिळालेल्या दिलाशापोटी सादर केले होते. जपान आणि अमेरिकेदरम्यान जुलै महिन्यात शुल्क करारावर व्यापक सहमती झाली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवरील आयातशुल्क वाढविले आहे. यात जपानही सामील आहे. जपानवर प्रारंभी 25 टक्क्यांचे आयातशुल्क लागू करण्यात आले होते, जे विशेषकरुन ऑटोमोबाइल आणि ऑटो पार्ट्स यासारख्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना प्रभावित करत होते. जुलैमध्ये जपान आणि अमेरिकेने व्यापक करारावर सहमती दर्शविली, ज्यात अमेरिकेकडून आयातावरील शुल्क 25 टक्क्यांवरून कमी करत 15 टक्के करण्याचे आश्वासन देण्यात आले. तर याच्या बदल्यात जपानने अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे पॅकेज सादर केले होते.
हे गुंतवणूक पॅकेज अमेरिकेसाठी आर्थिक सुरक्षेशी निगडित क्षेत्रे म्हणजेच सेमीकंडक्टर, दुर्लभ खनिज आणि औषधांच्या निर्मितीसाठी आहे. परंतु जपानी अधिकाऱ्यांनी देशाच्या हितांनाही लाभ होत असेल तरच गुंतवणूक केली जाणार असल्याची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांदरम्यान मतभेद आहेत. अमेरिकेसोबत समन्वयादरम्यान काही मुद्द्यांवर प्रशासकीय स्तरावर चर्चेची आवश्यकता आहे. ज्यामुळे अकाजावा यांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती जपान सरकारने दिली. जपानी उत्पादनांवर 15 टक्क्यांपेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येणार नसल्याचा आदेश अमेरिकेने जारी करावा अशी मागणी जपानने केली आहे.









