पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे दिला जाणारा हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत आणि शरद पवारांपासून बाळासाहेब देवरसांपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींना तो देण्यात आला आहे. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा होतो. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अर्थातच या उपस्थितीमुळे सर्वांचे विशेष करुन राजकारणी मंडळींचे लक्ष या कार्यक्रमाकडे, व्यासपीठावरील व्यक्तींच्या उपस्थितीकडे, बोलीकडे, देहबोलीकडे होते. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही डगरीवरचे हात ठेवले आहेत आणि लालदिव्यासाठी काहीही हे धोरण आहे. ओघानेच शरद पवार काय करतात हा मुख्य प्रश्न होता व आहे. मोदी पुण्यात गणेश पूजन, मेट्रो उद्घाटन करुन दिल्लीत परतले पण पवारांचे राजकीय धोरण व निवडणुकीसाठीची बाजू स्पष्ट झाली नाही. निवडणूक जाहीर होईपर्यंत ती जाहीर होईल असे वाटत नाही. पवारांच्या या भूमिकेचे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मार्मिक उदाहरण देऊन वर्णन केले आहे. पवार हे पानपट्टीच्या ठेल्यावर अडकवली जाते त्या जपानी बाहुलीसारखे आहेत. बघणाऱ्या प्रत्येकाला वाटते ही बाहुली आपल्याकडे बघून डोळा मारते. काहींना हे उदाहरण खटकले पण वास्तव फारसे वेगळे नाही. पवार काय करतील याचा कोणालाच कसला अंदाज नाही म्हणूनच ते नेहमी चर्चेत राहतात. ते बोलतात तसे करतात किंवा सांगतात तसे वागतात यावर कोणाचाही विश्वास नाही. तिच त्यांची विशेषत: आहे. राजकीय हवा त्यांना कळते आणि हवेची दिशा बघून ते आपली भाकरी भाजून घेतात. खरे तर लोकमान्य टिळक पुरस्कार आणि घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पण देशभर आणि मीडियात चर्चा शरद पवारांच्या उपस्थितीची. खरे तर नाव बदलून आकाराला आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना शरद पवारांची नरेंद्र मोदी समवेत एका व्यासपीठावरची उपस्थिती खटकली आहे. पण इंडिया आघाडी बांधून ठेवायची तर पवारांना पर्याय नाही. त्यामुळे नाराजी पलीकडे घटक पक्ष फारसे काही करु शकत नाहीत आणि आता ‘रात गयी बात गयी’ या उक्तीप्रमाणे शरद पवार इंडिया आघाडी तंबूत घुसतील आणि महाराष्ट्र संस्कृती, राजकारणापलीकडे कार्यक्रम, मतभिन्नता, मनभिन्नता अशी प्रवचने सुरु करतील. हे नेहमीचेच आहे. पवारांनी पुरस्कार सोहळ्यास हजर राहू नये. राज्यसभेत दिल्ली संदर्भात महत्त्वाचे विधेयक आहे. ते उपस्थित राहून मंजूर करुन घ्यावे असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पवारांना कळवले होते. शिवसेनेने सामना या त्यांच्या मुखपत्रात नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवले होते व याच दरम्यान विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहाची विरोधी पक्ष नेते ही पदे पदरात पाडून घेतली पण पवारांनी या कशालाच दाद दिली नाही. मी शब्द दिला आहे. पंतप्रधानांना मी निमंत्रण दिले आहे. मी समारंभाला जाणार असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी आपला शब्द खरा केला. व्यासपीठावर पहिला सर्जिकल स्ट्राईक आणि आक्रमकांची नावे पुसून टाकताना होणारा राजकीय विरोध यावरुन पवार व मोदी यांनी एकमेकांना चिमटे काढले पण व्यासपीठावर एकमेकांना उत्तम प्रतिसाद दिला. दोघांची देहबोली बोलकी होती. शरद पवारांनी तर मोदींना प्रसन्न चित्ते अभिवादन करुन त्यांची पाठ थोपटली. व्यासपीठावर एका बाजूला इंडिया आघाडी तर दुसऱ्या बाजूला एनडीए आघाडी अशी बैठक रचना दिसत होती. शरद पवार यांनी भाषणात देवेंद्र फडणवीस व अजितदादा यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री द्वय असा केला. पण सर्वांना सर्व ज्ञान झाले आहे. आज पवारसाहेब पुन्हा इंडिया आघाडी व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना चुचकारताना दिसले. नवे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवार गट यांच्या आमदारांना एकत्र करुन ते लोकसभेसाठी व्यूहरचना करतील. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मैदानासाठी पवारांचे सैन्य दोन्ही बाजूला आहे. त्यामुळे युद्ध कसे होणार, फायदा कोणाला होणार हे वेगळे सांगायला नको. पवार तिकीट घेऊन कात्रजचा घाट दाखवण्यात तरबेज आहेतच त्यात अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना विकास निधी देऊन मोठा बुस्ट दिला आहे. या सगळ्या भाकरी फिरवली ते भाकरी भाजली या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव भक्कम प्रादेशिक पक्ष करण्याची योजना दिसते आहे. शिवसेना व काँग्रेस सावध आहे. पण पवारांचा व्यासंग दांडगा आहे. शिवसेना आता वंचित व स्वराज्य पक्षाला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व इंडिया आघाडीचे नेतृत्व यासाठी प्रयत्नात आहे. आता वंचित आणि बीआरएस एकत्र येणार अशा हालचाली आहेत. यासाऱ्यात भाजपा व शिवसेनेचे आणि ठाकरे गटाचे काय हेते हे बघावे लागेल. पण जपानी बाहुली सर्वाना खुणावते आहे आणि सर्वांना आपली वाटते आहे. ऑगस्ट महिना क्रांतीचा महिना असे म्हटले जाते. ऑगस्ट क्रांतीदिन, स्वातंत्र्यदिन असे कार्यक्रम आहेतच. जोडीला यंदा चांद्रयान-3 ही मोहीम आहे. चंद्रयान-2 मोहीम शेवटच्या क्षणी फसली होती तरी आता तिसरी मोहीम अत्यंत अचूक आणि कमी खर्चात चंद्राकडे झेपावली आहे. फसलेल्या चांद्रयान दोनच्या मोहिमेतूनही नवी माहिती, फोटो उपलब्ध झाल्याने इस्त्राs आणि अवघे भारत वर्ष उत्साहात आहे. चंद्रावर आपले यान उतरवणारे भारत हे चौथे राष्ट्र ठरणार आहे. यातून भारताचा, इस्त्राsचा बोलबाला आणि महत्त्व अधोरेखित होणार आहे. तूर्त देशात राजकारण जोरात आहे. वक्ते-प्रवक्ते एकमेकांवर सोडले जात आहेत. जोडेमार, काळेफास, निषेध, आंदोलने आणि एकमेकांवर भोभो सुरु आहे. पावसाचा तडाखा, खरीप हंगाम वाया, महापूर आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना, महागाई, बेरोजगारी, राजकीय भ्रष्टाचार असे कळीचे व सर्व सामान्यांच्या जीवन-मरणाशी भिडणारे अनेक विषय आहेत पण जपानी बाहुली कुणासोबत राहणार हाच चर्चेचा विषय आहे.








