भारतात 6 लाख कोटींची गुंतवणूकही करणार : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधांना बळकटी
वृत्तसंस्था/ टोकियो
पंतप्रधान मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी टोकियो येथे झालेल्या 15 व्या भारत-जपान शिखर परिषदेत भाग घेतला. शिखर परिषदेत मोदी आणि जपानी पंतप्रधान इशिबा यांच्या उपस्थितीत अनेक सामंजस्य करारांची देवाण-घेवाण झाली. ‘आगामी पाच वर्षांत दोन्ही देशांमध्ये 5 लाख लोकांची परस्पर देवाण-घेवाण होईल. यामध्ये भारतातील सुमारे 50 हजार कुशल आणि अर्ध-कुशल कर्मचारी जपानला जातील’, असे पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. त्याचवेळी, इशिबा यांनी पुढील 10 वर्षांत भारतात 10 ट्रिलियन येन (सुमारे 6 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणाही केली.
पंतप्रधान मोदी यांनी येथे झालेल्या 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. या परिषदेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली. यादरम्यान बाराहून अधिक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. भारत आणि जपानमधील लघु-मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप्सना जोडण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी भर दिला. मोदींनी इशिबा यांना पुढील भारत-जपान शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रणही दिले. द्विपक्षीय सामंजस्य कराराला मूर्त स्वरुप दिल्यानंतर मोदी आणि इशिबा यांनी एकत्र जेवणही केले. डिनरदरम्यान, दोन्ही देशांमधील करारांसह जागतिक पातळीवरील अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
मोदींची आठव्यांदा जपानला भेट
पंतप्रधान म्हणून मोदींचा हा आठवा जपान दौरा आहे. भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी जपानला पोहोचले आहेत. जपाननंतर मोदी 31 ऑगस्ट रोजी चीनला पोहोचतील. स्थानिक कलाकारांनी टोकियोमधील एका हॉटेलमध्ये मोदींचे गायत्री मंत्राने स्वागत केले. यादरम्यान त्यांनी अनिवासी भारतीयांनाही भेट दिली.
चांद्रयान-5 मोहिमेसह ‘एआय’संबंधी करार
जपानशी झालेल्या करारांबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना माहिती दिली. दोन्ही देशांनी ऊर्जा, खनिजे, डिजिटल तंत्रज्ञान, अवकाश, सांस्कृतिक आदान-प्रदान, पर्यावरण आणि राजनैतिक प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. अवकाश क्षेत्राशी संबंधित करारामुळे चांद्रयान-5 मोहिमेत जपानची मदत लाभणार आहे. इस्रो आणि जपानची अंतराळ संस्था ‘जाक्सा’ यांच्यात सहकार्य कराराला मूर्त स्वरुप देण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी आर्थिक सुरक्षा उपक्रम सुरू केला असून त्यामध्ये पाच प्राथमिक क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाईल. सेमीकंडक्टर, खनिजे, औषधे, माहिती आणि संप्रेषण आणि स्वच्छ ऊर्जा ही महत्त्वाची क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. दोन्ही पंतप्रधानांनी ‘जपान-भारत एआय इनिशिएटिव्ह’ सुरू केला असून भाषा मॉडेल्स, डेटा सेंटर्स आणि एआय संबंधित सहकार्य मजबूत केला जाणार आहे.
सुरक्षा आव्हानांबाबत एकमेकांना मदत
भारत-जपानमधील सुरक्षा सहकार्याबाबत अनेक घोषणा केल्यामुळे दोन्ही देशांना आधुनिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल. यामध्ये सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य, संरक्षण उद्योग, विकास आणि इतर मुद्यांवर मदत समाविष्ट आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये औपचारिक चर्चा देखील लवकरच सुरू होईल.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’
मोदींनी जपानी कंपन्यांना भारतात येण्याचे आवाहन करताना ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ असा मंत्र दिला आहे. जागतिक शांततेसाठी आमची भागीदारी महत्त्वाची असल्यामुळे आम्ही पुढील दशकासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. गुंतवणूक, नवोपक्रम, आर्थिक सुरक्षा, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि जनसंपर्क हे आमच्या दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. याचदरम्यान पंतप्रधान मोदींनी जपानी पंतप्रधान इशिबा यांचे देशात स्वागत केल्याबद्दल आभार मानले.









