महिलांची विश्वकरंडक फुटबॉल : नॉर्वे, स्वीसचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या 2023 च्या महिलांच्या फिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जपान आणि स्पेन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. नॉर्वे आणि स्वीत्झर्लंड यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
जपान आणि नॉर्वे यांच्यातील झालेल्या लढतीत जपानने हा सामना 3-1 अशा फरकाने जिंकून या स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जपान महिला संघातील मियाझेवाने या स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदविला. या सामन्यात 21 व्या मिनिटांला गुरो रिटेनने हेडरद्वारे नॉर्वेचे खाते उघडले. तत्पूर्वी नॉर्वेच्या सिरेस्टेड इनगेनने आपल्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून जपानला बोनस गोल बहाल केला होता. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 50 व्या मिनिटाला रिसा शिमिझुने जपानचा दुसरा गोल नोंदविला. 81 व्या मिनिटाला मियाझेवाने जपानचा तिसरा गोल नोंदवून नॉर्वेचे या सामन्यातील आव्हान संपुष्टात आणले. यापूर्वी जपानने या स्पर्धेत झालेल्या सामन्यात स्पेनचा 4-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेतील मियाझेवाचा हा पाचवा गोल ठरला. या स्पर्धेतील जपानचा हा सलग चौथा विजय आहे. सलग चार सामने जिंकून जपानने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
स्पेन शेवटच्या आठ संघात
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अन्य एका सामन्यात स्पेनने स्वीत्झर्लंडचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जपान विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी हार पत्करल्यानंतर स्पेनने ऑकलंडमध्ये शनिवारी झालेल्या या सामन्यात दर्जेदार खेळ करून आपले आव्हान जिवंत ठेवले. या सामन्यात स्पेनतर्फे अॅटेना बोनमेटीने 2 गोल नोंदविले. स्पेनतर्फे अल्बा रेडोंडो, लेया ओडिना आणि जेनिफर हर्मोसो या प्रत्येकी एक गोल केला. सामन्यातील 5 व्या मिनिटाला बोनमेटीने स्पेनचे खाते उघडले. स्वीसला कोडिनाने 11 व्या मिनिटाला आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून बोनस गोल बहाल करत बरोबरीची संधी दिली. 17 व्या मिनिटाला स्पेनचा दुसरा गोल रेडोंडोने नोंदविला. 36 व्या मिनिटाला बोनमेटीने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल केला. कोडिनाने 45 व्या मिनिटाला स्पेनचा चौथा गोल नोंदविला. 70 व्या मिनिटाला हर्मोसोने स्पेनचा 5 वा गोल नोंदवून स्वीत्झर्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतील हर्मोसोचा हा तिसरा गोल आहे. आता या स्पर्धेत स्पेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना येत्या शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये नेदरलँडस् किंवा दक्षिण आफ्रिकाबरोबर होईल.









