वृत्तसंस्था / टोकियो
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जपान खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तसेच पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्या कामगिरीवर भारताची भिस्त राहील.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी केली आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या जोडीला जेतेपदाच्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. 2025 च्या बॅडमिंटन हंगामात सात्विक आणि चिराग या जोडीने तीन स्पर्धांमध्ये पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता.
एकेरीमध्ये लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू हे भारतीय बॅडमिंटनपटू चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण या दोन्ही खेळाडूंची गेल्या काही स्पर्धांतील कामगिरी निराशाजनक झाली आहे. सिंधू आणि लक्ष्य सेन यांना चांगल्या कामगिरीसाठी झगडावे लागेल. सेन आणि सिंधू यांना एकेरीमध्ये पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. लक्ष्य सेनचा या स्पर्धेतील सलामीचा सामना इंडोनेशियाच्या झिंगबरोबर तर पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना कोरियाच्या जिनबरोबर होणार आहे. पी. व्ही. सिंधूने 30 व्या वर्षात पदार्पण केले आहे. मध्यंतरी वारंवार स्नायु दुखापतीमुळे तिला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. महिला एकेरीत उनाती हुडा तसेच अनुपमा उपाध्याय हे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.









