प्रत्येक मुलामागे 6 लाख रुपयांची मदत, तरीही शहर सोडण्यास तयार नाहीत लोक
जपानमध्ये वेगाने वाढणाऱया शहरी लोकसंख्येमुळे सरकार राजधानी टोकियो समवेत अन्य महानगरांना सोडण्यासाठी दर मुलामागे 6 लाख 36 हजार रुपयांचा निधी देत आहे. लोकांनी ग्रामीण भागत जात स्वतःचे आयुष्य जगावे असा यामागील उद्देश आहे.
युवा दांपत्य जर टोकियोतून बाहेर पडत अन्य ठिकाणी स्थायिक झाल्यास त्यांना अन्य सुविधा देखील दिल्या जातील असे जपानच्या सरकारचे सांगणे आहे. 2027 पर्यंत 10 हजार लोक टोकियोमधून ग्रामीण भागांमध्ये राहण्यासाठी जातील अशी अपेक्षा सरकारला आहे.

शहरी लोकसंख्या वाढतेय
जगातील काही देश वाढत्या लोकसंख्येमुळे समस्येत सापडले आहेत. यात भारत आणि चीनचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु जपानमध्ये लोकसंख्या कमी होत असली तरीही तेथील शहरी लोकसंख्या मात्र वाढत आहे. म्हणजेच तेथील गावे ओस पडत असून लोक शहरांमध्ये राहायला येण्याचे प्रमाण वाढले आहे. हीच शहरी लोकसंख्या कमी करण्यासाठी जपान सरकारने अनोखी पद्धत अवलंबिली आहे.
टोकियो हे जगातील सर्वात मोठय़ा शहरांपैकी एक असून याची लोकसंख्या सुमारे 3.8 कोटी इतकी आहे. शासकीय आकडेवारीनुसार जपानच्या लोकसंख्येत वेगाने बदल घडून येत आहे. तेथील मुलांची संख्या घटत असून 65 पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही तेथील प्रजननदर वाढत नसल्याचे चित्र आहे.
जपानमधील रिकामी होत चाललेल्या नागरी वस्ती आणि गावांमध्ये ग्रामीण जीवनासाठी लोकांना आकर्षित केले जात आहे. याकरता चाइल्डकेअरची सुविधा सहजपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात आली आहे. या क्षेत्रांना पुन्हा मजबूत करण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जात आहेत.
शहर सोडून जाणाऱया लोकांना सरकार रोजगारासाठी देखील आर्थिक मदत करत आहे. परंतु 2021 मध्ये केवळ 2 हजार 400 लोकांनी ही योजना निवडली आहे. म्हणजेच टोकियोच्या एकूण लोकसंख्येपैकी 0.006 टक्के लोकांनीच हा पर्याय निवडला आहे.









