स्नायपर लँडरसोबत एच2-ए रवाना : खराब हवामानामुळे पूर्वी दोनवेळा टळले होते प्रक्षेपण
वृत्तसंस्था/टोकियो
जपानच्या अंतराळ संस्थेने गुरुवारी सकाळी स्वत:ची चांद्रमोहीम प्रक्षेपित केली आहे. मून मिशन स्नायपर लँडरसोबत एच2-ए रॉकेट तनेगाशिमा अंतराळ केंद्रातून सकाळी 8.42 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. हे चांद्रयान 3-4 महिन्यांमध्ये चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये चंद्रावर उतरणार असल्याची अपेक्षा आहे. हे चांद्रयान यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी प्रक्षेपित करण्यात येणार होते, परंतु खराब हवामानामुळे जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजेन्सीने (जाक्सा) याचे प्रक्षेपण टाळले होते. 28 ऑगस्ट रोजी देखील असाच प्रकार घडला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगचा जपानचा हा पहिला प्रयत्न असणार आहे. परंतु मे महिन्यात जपानमधील एका खासगी कंपनीने चंद्रावर उतरविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कंपनीला यात अपयश आले होते. जपानची चांद्रमोहीम स्वत:सोबत एक नवा एक्स-रे टेलिस्कोप आणि एक लाइट वेट हाय-प्रिशिसन स्पेक्ट्रोस्कोपी मून लँडर घेऊन रवाना झाली आहे. हे चांद्रयान भविष्यात चंद्रावर लँडिंग तंत्रज्ञान बेसच्या स्वरुपात काम करणार आहे. मोहिमेबद्दल जपानच्या अंतराळ संस्थेला इस्रोकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारताच्या चांद्रयान-3 च्या यशानंतर आता जपानच्या स्लिम लँडरवर जगाच्या नजरा आहेत. आतापर्यंतच्या चांद्रमोहिमांमध्ये लँडिंगच्या दृष्टीकोनातून ही सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून ज्या ठिकाणी लँड करायचे आहे, तेथेच अचूकपणे उतरणार असल्याचे मानले जातेय. रडारने युक्त स्लिम लँडर चंद्राच्या इक्वेटरवर लँड करणार आहे.
‘स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून’ला स्लिम हे नाव देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान अचूकतेप्रकरणी उर्वरित चांद्रमोहिमांच्या तुलनेत अधिक प्रभावी असणार असल्याचे मानले जात आहे. कुठल्याही चांद्रमोहिमेत सर्वात आवश्यक बाब पिन पॉइंट लँडिंग मानली जाते. मागील मोहिमांमध्ये जी जागा उपयुक्त तेथे लँडिंग करविण्यात यावे असे उद्दिष्ट राहिले होते. तर स्लिम इच्छितस्थळी अचूकपणे लँड करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 6 पट कमी गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे कुठल्याही लँडरसाठी तेथे लँड करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. परंतु कालौघात आणि टेलिस्कोपिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपे ठरले आहे. आता कुठल्याही मोहिमेपूर्वीच वैज्ञानिकांकडे हायडेफिनेशन इमेजेस आणि लँडिंग स्पॉटची आवश्यक माहिती उपलब्ध असते. या सर्व गोष्टी लँडिंग आणि त्यानंतरच्या संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषकरून दक्षिण ध्रूवावर हे अधिकच आवश्यक ठरते. चांद्रयान-3 ने चंद्राच्या याच सर्वात अवघड अन् सर्वात रहस्यमय ठिकाणी लँडिंग केले आहे.
पिनपॉइंट लॅडिंगचा फायदा
पिनपॉइंट लँडिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच एका खास ठिकाणी पूर्वीपासून लक्ष केंद्रीत केले जाते. याविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती पूर्वीपासून उपलब्ध असते अणि याचनुसार लँडरचे डिझाइन आणि पोस्ट लँडिंग रोव्हर मूव्हमेंट निश्चित केल्या जातात. संबंधित ठिकाणी पाण्याचे अस्तित्व आणि उर्वरित गोष्टींची अचूक माहिती प्राप्त करावी हा यामागचा उद्देश असतो. स्लिम यशस्वी ठरले तर याचे लक्ष्य स्वत:च्या आसपासचे 10 मीटरचे क्षेत्र असणार आहे. या लँडरचे वजन 200 किलोग्रॅम असून लांबी 2.4 मीटर आणि रुंदी 2.7 मीटर इतकी आहे. यात सर्वोत्तम रडार, लेझर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे. ही उपकरणे अचूक लँडिंगसाठी सहाय्यभूत ठरणार आहेत. यातील कॅमेरे चंद्रावरील टेकड्यांची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे मिळवू शकणार आहेत. तसेच यात लूनर एक्सप्लोरेशन व्हेईकल आणि लूनर रोबोट देखील असून त्यांना ओआरए-क्यू नाव देण्यात आले आहे.









