बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आज बुधवार दि. 6 रोजी आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे. या मैदानाचे वैशिष्ट म्हणजे युटूबचा जादुगर देवा थापा (नेपाळ) याची मनोरंजक प्रात्यक्षिके बेळगावच्या कुस्ती शौकिनांना प्रथमच पहायला मिळणार आहेत. मैदानाची तयारी अंतिम टप्यात आली असून सुमारे 25 हजार कुस्तीशौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली आहे.
आनंदवाडीच्या आखाड्यात होणाऱ्या आजच्या मैदानात बेळगावात प्रथमच युटूबद्वारे संपूर्ण देशात कुस्तीचा प्रसार करुन घराघरात कुस्तीचे महत्त्व पटवून देणाऱ्या देवा थापा (नेपाळ) याची उपस्थितीत राहणार आहे. आतापर्यंत देवा थापा याने दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आदी राज्यात आपल्या कुस्तीची छाप सोडली असून त्याला कुस्तीतील युटूबचा जादूगर म्हणूनही ओळखले जाते. झटपट व मनोरंजक कुस्ती करण्यात देवा थापा पटाईत असून त्याच्या बरोबरच्या अनेक मल्लांना त्याने पराभूत केले आहे. त्याची चपळाई व आकर्षक डावामुळे प्रतिस्पर्ध्याला कळत नकळत तो पराभूत करतो. या मैदानात प्रमुख कुस्ती धुमाकूळ घालणारा महाराष्ट्राचा अस्सल मल्ल सिकंदर शेख कोल्हापूर व भारत केसरी गुरुजीत मागरोड पंजाब यांच्यात बेळगाव केसरी किताबासाठी होणार आहे. ही कुस्ती बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. यावर्षीच्या कुस्ती हंगामात सिकंदरने विजयाचे घौडदौड कायम ठेवली आहे. पण ही घौडदौड रोखण्यासाठी गुरूजीत मागरोड सज्ज असून आजच्या लढतीत ते स्पष्ट होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची लढत बेळगाव मल्ल सम्राट केसरी किताबासाठी माऊली कोकाटे पुणे व महदी इराण यांच्यात लढत होणार आहे. ही कुस्ती जय भारत फौउंडेशन यांनी पुरस्कृत केली आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती दर्शन केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध हादी इराण यांच्यात होणार आहे. ही कुस्ती दर्शनचे संचालक श्रीकांत देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटकाचा वाघ कार्तिक काटेची जयदीप पाटील पुणे यांच्यात होणार आहे. त्याशिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिरजे यांनी कळविले आहे.









