वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्टेट बँकेचे विद्यमान संचालक आणि स्वामीनाथक जानकीरामन यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरपदी करण्यात आली आहे. सध्याचे उपाध्यक्ष महेश कुमार जैन यांचा कार्यकाल उद्या गुरुवारी संपत आहे. त्यानंतर जानकीरामन हे त्या पदावर येतील. त्यांचा कार्यकाल पद स्वीकारल्यापासून 3 वर्षांचा असेल.
जैन हे या पदावर गेल्या पाच वर्षांपासून आहेत. 2021 मध्ये त्यांना दोन वर्षांची कालावधीवाढ दिली गेली होती. त्यांच्याकडे देखरेख विभाग, वित्तीय समावेशकता विभाग आणि विकास विभाग यांचे उत्तरदायित्व होते. हेच विभाग जानकीरामन यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या कामांमध्ये परिवर्तनही केले जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









