पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ः झटपट मिळणार एकत्रित सुविधा ः नवीन नाण्यांचेही लोकार्पण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने देशवासियांसाठी एक खास पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि या योजनांनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले असून ‘जन समर्थ पोर्टल’ असे त्याचे नाव आहे. या पोर्टलमुळे विविध सरकारी कार्यालयात नागरिकांना सारख्या चक्करा माराव्या लागणार नाहीत. नवे पोर्टल सुरू करण्याबरोबरच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित नवीन नाण्यांचे त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रति÷ित सप्ताह सोहळय़ाचे (आयकॉनिक विक सेलिब्रेशन) उद्घाटन केले. यादरम्यान त्यांनी जन समर्थ पोर्टल सुरू केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांमध्ये अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या कृतींद्वारे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जनहितार्थ बरेच कार्य केल्याचे नमूद केले. देशातील सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणे असो किंवा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे असो, गेल्या 75 वर्षांत अनेक सहकाऱयांनी मोठे योगदान दिल्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध सुविधांचे पोर्टलवर एकत्रिकरण
केंद्र सरकारच्या चार कर्ज श्रेणीतील 13 योजना जन समर्थ पोर्टलवर उपलब्ध आहे. तर, 125 हून अधिक कर्ज देणाऱया वित्तीय संस्था या पोर्टलवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचे कौतुक केले असून युवकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन कोणत्या योजनांतून कर्ज घ्यायचे हे युवकांना निश्चित करता येणार आहे. कर्जासाठी कमी प्रक्रिया होणार असून अधिकाधिक जणांना कर्ज मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वयंरोजगार वाढवण्यासाठी, सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी हे पोर्टल मोठी भूमिका बजावेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
सरकारी संस्थादेखील या पोर्टलवर जोडल्या जातील. यामुळे डेटाची डिजिटल पडताळणी करणे अधिक सोपे होईल आणि कर्जदारांना होणारा त्रास कमी होईल. कर्ज घेणारे लाभार्थी एकाच ठिकाणी वेगवेगळय़ा ऑफर्स पाहून त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडू शकतील. केंद्र सरकारची 8 पेक्षा जास्त मंत्रालये, 10 पेक्षा जास्त नोडल एजन्सी आणि 125 हून अधिक कर्जदार एकाचवेळी या पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याने देशवासियांना या डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
नवी नाणी ध्येयांची आठवण करून देतील
सध्या रुपयाचा गौरवशाली प्रवास सुरू आहे. या डिजिटल प्रवासात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला वाहिलेल्या नवीन नाण्यांचेही प्रकाशन करण्यात आले. ही नवीन नाणी देशातील जनतेला ‘अमृत’ काळातील उद्दिष्टांची सतत आठवण करून देतील आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची प्रेरणा देतील, असे पंतप्रधान म्हणाले.
लोकसहभाग वाढवण्यावर भर
गेल्या आठ वर्षांत सरकारने विविध आयामांवर काम केले आहे. यावेळी, देशात वाढलेल्या लोकसहभागाने देशाच्या विकासाला चालना दिली, देशातील गरिबातील गरिबालाही सक्षम केले. त्याचवेळी स्वच्छ भारत अभियानाने गरिबांना सन्मानाने जगण्याची संधी दिली. पक्के घर, वीज, गॅस, पाणी, मोफत उपचार या सुविधांमुळे गरिबांचा मान-सन्मान वाढला आहे. कोरोनाच्या काळात मोफत रेशन योजनेने 80 कोटींहून अधिक देशवासीयांना भुकेच्या भीतीतून मुक्त केले आहे, असेही पंतप्रधानांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.
सरकार-केंद्रित कारभाराचा देशाला फटका
देशाने भूतकाळात सरकारकेंद्रित कारभाराचा मोठा फटका सहन केला आहे. पण आज एकविसाव्या शतकात भारत लोककेंद्रित प्रशासनाच्या दृष्टिकोनातून पुढे गेला आहे. लोकांनीच आम्हाला आपल्या सेवेसाठी येथे पाठवल्यामुळे स्वतः लोकांपर्यंत पोहोचण्यात आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.









