वृत्तसंस्था / कोलकाता
लोकांना एसएमएस पाठवून फसविणारी जमतारा येथील टोळी आता आसनसोलमध्ये स्थलांतरित झाली आहे. ‘काही तासांमध्ये आपल्या घराचा वीज पुरवठा बंद होणार आहे’, ‘आपल्याला लठ्ठ वेतनाची वर्क फ्रॉम होमची सुविधा असणारी नोकरी मिळणार आहे’ अशा तऱ्हेचे भीती निर्माण करणारे किंवा मोहात पाडणारे एसएमएस पाठवून आपली व्यक्तीगत माहिती आणि बँक खात्यांची माहिती मिळविणे आणि नंतर बँक खाते हॅक करुन आपली फसवणूक करणे, यात या टोळीचा हातखंडा आहे. त्यामुळे असा कोणताही व्हॉटस्अप संदेश किंवा एसएमएस आला तरी त्यात दिलेल्या लिंकला क्लिक करण्याची चूक करु नका. तशी चूक केल्यास एका गुप्त अॅपद्वारे आपल्या मोबाईलमध्ये साठविलेली आपली सर्व माहिती, बँकांच्या खात्यांची माहिती इत्यादी या टोळीला मिळते, असा इशारा केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा शाखेने सर्व नागरीकांना दिला आहे.
झारखंडमधील एक छोटे गाव जमतारा येथून हा फसवणुकीचा धंदा इतके दिवस केला जात होता. लोकांच्या मनात असणारी भीती, आपल्या पैशाची चिंता, किंवा त्यांचा लोभ यांचा लाभ उठवून अशा प्रकारे त्यांची ऑन लाईन फसवणूक याच गावातून केली जात होती. तथापि, आता केंद्र सरकारने या टोळ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांच्या हस्तकांना अटक करण्याचा धडाका लावल्याने आता त्यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये स्थलांतर केले आहे.
संदेशांपासून सावध रहा
त्यामुळे आता आपल्याला असे एसएमएस किंवा संदेश जमतारामधून नव्हे, तर आसनसोलमधून येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. असा कोणताही भीती दाखविणारा, किंवा मोहात पाडणारा संदेश आला तरी त्यात दिलेल्या लिंकला कधीही क्लिक करण्याची चूक केली जाऊ नये. ही चूक टाळल्यास आपला डाटा सुरक्षित राहतो आणि आपली फसवणुकीपासून सुटका होऊ शकते, असे आवाहन अनेक सायबर तज्ञांनी केले आहे.
छोट्या शहरांवर डोळा
अशा सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा डोळा सध्या छोट्या शहरांमधील बँक खाते धारकांवर आहे. महानगरांमधील लोक आता त्यांच्या युक्त्यांना सरावलेले असल्याने त्यांच्यापैकी बहुतेक जण त्यांच्या जाळ्यात सापडत नाहीत. मात्र, छोट्या शहरांमधील नवश्रीमंतांना अद्याप या क्लृप्त्या माहिती नसल्याने ते त्यांच्या जाळ्यात अडकू शकतात. म्हणून त्यांनी अत्यंत सावध असणे आवश्यक आहे, असे सरकारी सायबर सुरक्षा यंत्रणांकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.









