वृत्तसंस्था/ कोलकाता
134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूर एफसी आणि नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जमशेदपूर एफसी संघाने लडाख एफसी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात नॉर्थ इस्ट युनायटेड एफसीने शिलाँग लेजाँग एफसीवर 2-1 अशा गोलाने मात करत शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले आहे.
जमशेदपूर आणि लडाख यांच्यातील सामन्यात 28 व्या मिनिटाला बचाव फळीत खेळणाऱ्या लडाखच्या सिजूने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून जमशेदपूरला बोनस गोल बहाल केला. मध्यंतराला केवळ 2 मिनिटे बाकी असताना प्रफुल्लने जमशेदपूरचा दुसरा गोल नोंदवून लडाखचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.
दुसऱ्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने शिलाँग लेजाँगवर 2-1 असा निसटता विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अॅजेरिने 5 व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडचे खाते उघडले. 81 व्या मिनिटाला बदली खेळाडू फिगोने शिलाँग लेजाँगला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास केवळ 2 मिनिटे बाकी असताना अॅजेरिने नॉर्थ ईस्ट युनायटेडचा दुसरा आणि निर्णायक गोल करत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. नॉर्थ ईस्ट युनायटेडचा अद्याप इ गटातील एक सामना बाकी आहे. या गटात नॉर्थ ईस्ट युनायटेडने 6 गुणासह पहिले स्थान मिळविले. शिलाँग लेजाँग दुसऱ्या स्थानावर आहे.









