पंतप्रधान मोदींना युवतीकडून संस्कृतमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी दिल्ली मेट्रोमध्ये एका युवतीने त्यांना संस्कृत भाषेमधून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी रविवारी दिल्ली मेट्रोतून प्रवास करत लोकांना सुखद धक्का दिला होता. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत बसलेल्या एका युवतीने संस्कृत भाषेतील जन्मदिन गीत गाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
हे गीत असे आहे…
जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे
शंतनोतु हि सर्वदा मुदम्
प्रार्थयामहे भव शतायु:
ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु
पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकम्
कवितेचा अर्थ : प्रियजनाला जन्मदिनाच्या शुभेच्छा. हा जन्मदिन तुमच्यासाठी आनंद अन् समृद्धी घेऊन येणारा ठरावा. देवाकडे तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. देवाने नेहमी तुमचे रक्षण करावे. तुम्ही याच मार्गावर चालत रहावे, प्रामाणिकपणे काम करावे आणि तुमचे जीवन यशस्वी ठरावे.
भाजपकडून विशेष गीत प्रदर्शित
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 73 व्या जन्मदिनामित्त भाजपने एक विशेष गीत जारी केले आहे. या गीतात देशासाठी पंतप्रधान मोदींनी केलेली कामगिरी आणि त्यांची स्वप्ने अधोरेखित करण्यात आली आहेत. या गीताचे शीर्षक ‘सपने नहीं हकीकत बुनते’ असे आहे.
दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य अन् दीर्घायुष्य द्यावे असे नमूद केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तम आरोग्याची अन् दीर्घायुष्याची प्रार्थना करत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर बॉलिवूडमधील कलाकारांनीही मोदींना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत.