काँग्रेस खासदार राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक सरकारकडून मांडण्यात यावे, असे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी वैध असून ती घटनात्मक आणि लोकशाहीच्या अधिकारांवर आधारित असल्याचा दावा राहुल गांधी यांना पत्रात केला आहे.
मागील 5 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. परंतु कुठल्याही राज्याला केंद्रशासित प्रदेशात रुपांतरित करण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याचे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर केंद्रशासित प्रदेश लडाखला घटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सामील करण्यासाठी कायदा आणला जावा, अशी विनंती आम्ही करत आहोत. लडाखच्या लोकांचे अधिकार, भूमी आणि ओळखीचे @रक्षण करत त्यांच्या सांस्कृतिक, विकासात्मक आणि राजकीय आकांक्षांना संबोधित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
तर सूत्रांनुसार पावसाळी अधिवेशनात जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक मांडण्याची सरकारची योजना नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचे विभाजन करत त्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतरित केले होते. तर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय शक्य होईल तितक्या लवकर घेतला जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर दिले आहे.









