‘युएनएचआरसी’मध्ये भारताचे पाकिस्तानला पुन्हा चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांनी पुन्हा एकदा भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. भारताने त्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हिना रब्बानी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जिनिव्हा येथील भारतीय राजनयिक सीमा पुजानी यांनी पाकिस्तानला दहशतवाद पसरवणारा देश असे संबोधत चोख प्रत्युत्तर दिले. तसेच ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील’ असे सांगतानाच पाकिस्तानने भारतीय भूभागावर अवैध कब्जा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘युएनएचआरसी’च्या सभेमध्ये भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा पर्दाफाश केला. पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण दिले आहे. दहशतवादी हाफिज सईद आणि दहशतवादी मसूद अझहर यांना वर्षानुवर्षे पोसले गेले आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण होते, असे त्यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर करणे थांबवावे, असेही त्यांनी ठणकावले. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारताविरुद्ध दुर्भावनापूर्ण प्रचारासाठी या प्रति÷ित व्यासपीठाचा पुन्हा एकदा गैरवापर केल्याचे त्या पुढे म्हणाल्या. पाकिस्तानची मानवी हक्कांवरची चर्चा हा मोठा विनोद असल्याचेही त्यांनी नमूद केले.









