वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मूमध्ये स्थायिक असलेला युवा क्रिकेटपटू वंशज शर्मा याने आपल्या जन्म तारखेच्या दाखल्यामध्ये खोटी माहिती दिल्याबद्दल त्याच्यावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने दोन वर्षांची बंदी घातली आहे. शर्माने दाखल केलेल्या आपल्या जन्म दाखल्यामध्ये दोन विविध तारखांची नोंद केल्याचे आढळून आले. या प्रकरणी बीसीसीआयकडून रितसर चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
वंशज शर्मा हा जम्मूमधील बिस्नाह येथील रहिवासी आहे. पण त्यानंतर त्याने बिहारमध्ये आपले स्थलांतर केले. बिहार राज्य क्रिकेट संघटनेकडे त्याने आपले अधिकृत नाव नोंदणी केली. बिहारमधील विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने आपला सहभाग दर्शविला आहे. बिहार क्रिकेट संघटनेकडे त्याने आपली नोंद 23 वर्षाखालील वयोगटासाठी करताना वेगळा जन्म दाखला दिल्याचे आढळून आले. तत्पूर्वी जम्मू-काश्मिर क्रिकेट संघटनेकडे त्याने आपल्या नावाची नोंदणी केली नसल्याचे जम्मू-काश्मिर क्रिकेट संघटनेचे प्रमुख ब्रिगेडीयर अनिल गुप्ता यांनी खुलासा केला आहे. तो जम्मू-काश्मिरचा खेळाडू नसल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले आहे.









