वार्ताहर/जांबोटी
जांबोटी भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जांबोटी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची वर्गखोली सोमवारी कोसळल्यामुळे छतासह बाकडी व इतर शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या या ठिकाणी वर्ग बसविणे धोकादायक बनले आहे. जांबोटी सीआरपी कार्यालयाला लागून असलेल्या शाळेच्या इमारतीची भिंत पावसामुळे सोमवारी रात्री कोसळली आहे. शिवाय त्याला लागून असलेल्या दोन खोल्यांचे छतदेखील कोसळल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सदर शाळाखोली रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे अनर्थ टळला असला तरी विद्यार्थी शाळेमध्ये या ठिकाणाहूनच ये-जा करतात. तसेच शाळाखोलीची भिंत अर्धवट कोसळली असून, मोठा पाऊस झाल्यास पुन्हा भिंत कोसळण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
शाळाखोली पावसामुळे कोसळल्याचे समजताच शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी याची माहिती त्वरित जांबोटी ग्राम पंचायतीला कळविल्यानंतर मंगळवारी लागलीच ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई, पीडिओ राजू तळवार, सेक्रेटरी शिवाजी धबाले, माजी एसडीएमसी अध्यक्ष मिलिंद डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या शाळाखोलीची पाहणी केली. व सर्व अहवाल त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. कोसळलेल्या शाळा खोलीतील सर्व साहित्य अन्यत्र हलविण्याची व्यवस्था करण्यात आली असून सध्या सदर धोकादायक शाळा इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसू नये, असा आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांना इतर वर्गखोल्यांमध्ये बसवून वर्ग घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.









