दुरुस्तीसाठी 6 कोटीचा निधी मंजूर : पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर : वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची नागरिकांसह प्रवासीवर्गात भीती
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेतले आहे. मात्र सदर काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्यामुळे, पावसाळ्dयापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली आहे. तरी कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असल्यामुळे गोवा, हुबळी, धारवाड, बेंगळूर आदी ठिकाणी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात माल व प्रवासी वाहतूक चालते. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी या रस्त्याची पक्की दुरुस्ती करण्यात आल्यामुळे वर्षभरापूर्वी हा रस्ता सुस्थितीमध्ये होता. परंतु मागील वर्षी पावसाळ्dयात या रस्त्यावरून अवजड वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. अवजड वाहतूक करणाऱ्या मल्टी एक्सेल वाहनांनी या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक सुरू केली.
वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनल्याने या रस्त्याचा बराचसा भाग वाहतुकीसाठी निरुपयोगी बनला. खराब रस्त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. वाहतूक वारंवार ठप्प होत असल्यामुळे या मार्गावरील बससेवा कोलमडली. परिणामी विद्यार्थी व प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून जांबोटी-खानापूर रस्ता दुरुस्तीसाठी केंद्रीय राज्य मार्ग विकास निधीमधून 6 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. यानुसार संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती व फेरडांबरीकरणाची निविदा मंजूर झाली. पंधरा दिवसांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते जांबोटी येथून रस्त्याच्या कामाच्या दुरुस्तीचा शुभारंभ करण्यात आला. परंतु कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम कूर्मगतीने सुरू केले आहे.
काम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी
आतापर्यंत केवळ जांबोटीपासून मलप्रभा नदीपर्यंतच्या 8 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून केवळ पॅचवर्क करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ पंधरा दिवसाचा कालावधी बाकी असल्यामुळे इतक्या कमी वेळेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे व फेर डांबरीकरणाचे काम कसे पूर्ण होणार, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. पावसाळ्dयापूर्वी रस्त्याची दुरुस्ती पूर्ण न झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जांबोटी भागातील नागरिकांमधून होत आहे.









