ऑनलाईन टीम/तरुण भारत
Women Entry Ban In Jama Masjid: दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीत एकट्या मुलीला किंवा मुलींच्या समूहाला बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगानेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, आम्ही या प्रकरणाची स्वत: दखल घेत आहोत, ही गंभीर बाब आहे. लवकरच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, जामा मशिदीबाहेर मुलींच्या प्रवेश बंदीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. यावर मुलींना मशिदींमध्ये प्रवेश नसल्याचं लिहिण्यात आलेलं आहे. मशीद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. मशीद परिसरात व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मशीद प्रशासनाच्या या निर्णायाची सोशल मीडियावर चर्चा आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून जामा मशीद व्यवस्थापनाला याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मागवण्यासोबतच महिलांशी कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नये, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
महिला आयोगाची नोटीस –
जामा मशिदीमध्ये मुलांना प्रवेश बंदी केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालवीय यांनी मशीद प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्वाती मालवीय यांनी यांनी ट्वीट करत प्रतिक्रियाही दिली आहे. “जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशबंदी हा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात मशिदीच्या इमामांना महिला आयोग नोटीस बजावत आहे. महिलांना प्रवेश नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही”, असं ट्वीट मालवीय यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वाती मालवीय म्हणाल्या की, महिलांना मशिदीमध्ये प्रवेश न देणं असंवैधानिक आहे. भारतामध्ये तालिबानी आदेश, निर्णय चालणार नाहीत. जामा मशिदीच्या इमामांना नोटीस पाठवत याप्रकरणी उत्तर मागितले आहे.
मशीद व्यवस्थापनाचा तर्कहीन युक्तिवाद
त्याचबरोबर मशिदीत मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या निर्णयाबाबत मशीद व्यवस्थापनाने तर्कहीन युक्तीवाद केला आहे.महिलांच्या प्रवेशावर बंदी नसल्याचे जामा मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. केवळ अविवाहित महिलांना प्रवेश बंदी आहे. कारण या धार्मिक स्थळावर मुली अनुचित कृत्य करतात, व्हिडिओ शूट करतात. हे सर्व थांबवण्यासाठी बंदी घालण्याचे पाऊल उचलले आहे. कुटुंबं किंवा विवाहित जोडप्यांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, असे मशिदी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.