पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा : मुख्य कार्यकारी अधिकारी धारेवर
प्रतिनिधी / बेळगाव
अर्ज-विनंत्या करून, निवेदने देऊनसुद्धा कॅन्टोन्मेंट परिसराला पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढून खानापूर रोडवर रास्ता रोको केला. यावेळी अधिकाऱयांच्या नावे शिमगा करून पाणीपुरवठय़ाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
कॅन्टोन्मेंट परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या जलस्रोतावर अवलंबून रहावे लागते. पाणी बिलाची रक्कम भरली नसल्याचे कारण सांगून प्रारंभी पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली. त्यानंतर कॅन्टोन्मेंटचा संपूर्ण पाणीपुरवठा तोडण्यात आला. परिणामी कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी मिळाले नाही.
दोन महिन्यांपूर्वी पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्याने मोर्चा काढून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र आता पुन्हा पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंटवासियांचे हाल होत आहेत.
पिण्याचे पाणी नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून टँकरने किंवा बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांची भेट घेऊन पाणीपुरवठा करण्याची विनंती केली होती. तरीदेखील कोणतीच दखल घेण्यात आली नाही. कधी वीजपुरवठा खंडित, तर कधी पाणीपुरवठा बंद अशा स्थितीत कॅन्टोन्मेंटचे कामकाज सुरू असल्याने या निषेधार्थ गुरुवारी कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढला. पाणीपुरवठा सुरळीत कधी करणार? असा जाब मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना विचारला.
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विहिरी किंवा कूपनलिकांचे पाणी प्यावे लागते. त्यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने भटकंती करावी लागत आहे. पाणीपट्टी भरून देखील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने याला पूर्णतः कॅन्टोन्मेंटचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसह अभियंत्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि एलऍण्डटीच्या अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. जर पाणीपुरवठा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बिलाची रक्कम भरली नसल्याचे सांगून एलऍण्डटी कंपनीने पाणीपुरवठा बंद केला आहे. कर्मचाऱयांचे वेतन थांबवून बिलाची रक्कम भरण्यास तयार आहे. तरीदेखील एलऍण्डटीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी सांगितले. तसेच पाणी हवे असल्यास जिल्हाधिकाऱयांना भेटा, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी केला. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर जमलेले नागरिक चांगलेच भडकले. थेट आंदोलनाचा पवित्रा घेऊन खानापूर रोडवर ठिय्या मांडून रस्ता रोको केला. परिणामी खानापूर रोडवरील वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाला. पाणीपुरवठा सुरळीत करा, त्यानंतरच रस्त्यावरून बाजूला हटू, अशी भूमिका महिलावर्गांनी घेऊन कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांविरोधात आक्रोश केला. पाणीसमस्या निर्माण होण्यास कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून खानापूर रोडवर शिमगा केला.
रस्ता रोको केल्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयापासून संचयनी चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने शेवटी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून रस्ता रोको केलेल्या महिलांना बाजूला करून वाहनांना जाऊ दिले. याचदरम्यान कॅन्टोन्मेंटच्या माजी सदस्या राहिला शेख, साजिद शेख यांच्यासह प्रमुख नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसोबत बैठक करून पाणीसमस्या निवारणासंदर्भात चर्चा केली. यावेळी देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि एलऍण्डटीकडे बोट करून जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी महापालिका आयुक्तांना संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केल्यानंतर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शविली. बैठकीत झालेली चर्चा कार्यालयासमोर थांबलेल्या नागरिकांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पाण्यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर तीन तास नागरिकांनी ठिय्या आंदोलन छेडले होते.









