जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंतरवली गावात जाऊन आंदोलन कर्त्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले. मंत्रालयातून फोन आल्यानंतरच शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला झाला असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच इंडीया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार घडवून आणला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली तसेच त्यांना तुमच्या केसालाही धक्का लागला तर संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा करेन असे आश्वासन दिल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ” शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीमार करण्याचं कारण काय ? राळेगणसिद्धी गावात आण्णा हजारे ज्या प्रकारे मंदिरात आंदोलन करायचे त्याच प्रमाणे जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही लोक आंदोलनासाठी बसले होते. परंतु जालन्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागू नये नको म्हणून सरकारने हे आंदोलन मोडून काढले. आणि यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन आला होता. या लाठीचार्जमध्ये पोलिसांनी विद्यार्थी, महिला, वृद्धांवर अमानुष लाठीमार केला…अमानवी पद्धतीने लोकांना मारलं गेलंय…त्यांची डोकी फोडली…लोकांवर गोळ्या चालवल्या गेल्या. एवढं करण्याचं कारण काय ?” असा परखड सवालही संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारला विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या दिवशी लाठीमार झाला, त्यादिवशी इंडिया या विरोधी आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. देशाभरातील आणि महाराष्ट्रातील लोक तसेच माध्यमे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काय बोलणार आहेत, याकडे टक लावून बसला होता. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीमार घडविण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “सरकारने केलेल्या लाठीचार्ज मागे २ महत्वाची कारणं आहेत. शासन वैफल्यग्रस्त असल्याने सरकार फ्रस्ट्रेशनमध्ये आलेलं आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांना सरकार तोंड देऊ शकत नाही. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर असा लाठीमार करायचा, सरकारची ही कुठली पद्धत?” असाही परखड सवाल त्यांनी सरकारला विचारला.








