सर्व गोमंतकीयांनी एकत्र यावे : सेव्ह गोवा मंच
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याला मानवनिर्मित वाळवंट बनवण्याची जशी काही योजनाच आखलेल्या गोवा सरकारचा निषेध करण्यासाठी गोमंतकीयांनी राज्यव्यापी जलक्रांती आंदोलन सुरू करावे, असे आवाहन सेव्ह म्हादई सेव्ह गोवा मंचने केले आहे. म्हादईचे संरक्षण करण्यात कोणताही पुढाकार न घेणारे हे सरकार उलटपक्षी राज्यातील दुर्मीळ जलस्रोत नष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, असा आरोपही मंचने केला आहे. हे काम आताच न झाल्यास राज्यातील सर्व जलस्रोत आणि म्हादईचे अस्तित्वही पूर्णपणे नष्ट करणार आहे, असे मंचने म्हटले आहे.
गोव्यावर आधीच पाण्याचे संकट ओढवले आहे. खांडेपार नदी पार कोरडी पडली आहे. त्यामुळे खाणींच्या ख•dयांमधील पाणी ओपाकडे वळविण्यात आले आहे. हेच पाणी पिण्याची वेळ गोमंतकीयांवर आली आहे. म्हैसाळ धरणही कोरडे पडले आहे. त्याशिवाय अन्य कितीतरी जलस्रोत आणि झरेही आटले आहेत.
अशावेळी औद्योगिक वसाहती आणि रिअल इस्टेट तसेच पेडणेपासून काणकोणपर्यंत बड्या उद्योजकांच्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकामी खुद्द काही मंत्रीच पुढाकार घेत पाणी शोधत गावात चकरा मारताना दिसत आहेत.
सरकारच्या या अपयशामुळे अनेक जलस्रोत धोक्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गोव्यात वाहणारे म्हादई आणि अन्य नद्यांचे जलप्रवाह वळविणे., पाणी भक्षक उद्योग, मेगा प्रकल्प आणि पंचतारांकित हॉटेल्सकडून स्थानिक जलस्रोत बळकावणे हे सर्व प्रकार हावरटपणा आणि अहंकाराने आंधळे झालेल्या सरकारच्या आत्मघातकी धोरणांचे परिणाम आहेत, असे सेव्ह गोवा मंचने म्हटले आहे.
ही परिस्थिती राज्यासाठी अत्यंत भयानक आणि घातक बनली आहे. त्यामुळे गोव्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जलस्रोत वाचवण्यासाठी राज्यव्यापी जलक्रांती सुरू करावी, असे आवाहन सेव्ह म्हादई सेव्ह गोवा मंचने केले आहे.
त्या उपक्रमाचा भाग म्हणून येत्या दि. 18 जून रोजी गोवा क्रांती दिनाच्या शुभ प्रसंगी मडगावात लोहिया मैदानावर दुपारी 4 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे आपल्या जलस्रोतांना वाचवण्याची ही शेवटची संधी असून त्यात अपयशी ठरल्यास भावी पिढ्यांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे, असा संदेश सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी मंचतर्फे माहिती देण्यात आली