पाण्याविना नागरिक हैराण : अर्धवट कामे टाकून ठेकेदार गायब : नळपाणी योजना पूर्ण करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगावमध्ये जलजीवन केंद्राच्या मुबलक आणि 24 तास पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करून एक वर्ष लोटले. मात्र अद्याप सदर योजना काही कार्यान्वित झाली नाही. पिण्याचे पाणी तर नाहीच, मात्र घरोघरी उभारलेले नळ कनेक्शनचे दगडी फलक जे घरोघरी अंगणातील ‘पाणी नाही अडचण अधिक’ अशी परिस्थिती झाल्याने, ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक अर्धवट कामे टाकून ठेकेदार गायब झाल्याने पूर्वीपासून ग्रामपंचायतची सुरू असलेलीच नळ पाणी योजना बरी असे म्हणण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला जनतेला सामना करावा लागणार आहे. यासाठी सदर ठेकेदाराने तातडीने सदर नळपाणी योजना कार्यान्वित करावी आणि उर्वरित सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









