देवरुख :
देवरुखनजीकच्या ओझरे गणेशबाग येथे मंगळवारी दुपारी लागलेल्या वणव्यात जलजीवन योजनेचे पाईप जळून खाक झाले. या दुर्घटनेत संबंधित ठेकेदाराचे सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संगमेश्वर तालुक्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी वणव्यांमुळे आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. मात्र शासनाकडून कोणतीच नुकसान भरपाई दिली जात नाही. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ओझरे गणेशबाग येथील माळावर वणवा पेटला. यामध्ये जलजीवन योजनेच्या पाईपनी पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. आगीत २ इंचीचे ६ कि. मी. लांबीचे व ३ इंची १२ कि. मी. लांबीचे पाईप जळाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.








