जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ सावदा परिसराला आज सकाळी 10.35 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नाशिकच्या मेरी केंद्रावर 3.3 रिश्टर स्केल अशी या भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
नाशिक येथील पाटबंधारे विभागाच्या मेरी केंद्रापासून 278 किमीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसून प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हतनूर धरणावरील भूकंप मापन यंत्र बंद
भुसावळ परिसरात तापी नदीवर 1970 मध्ये हतनूर हे धरण बांधले गेले असून या धरणावर भूकंप मापन यंत्र जलसंपदा विभागाने बसवले आहे. हे यंत्र मागील पाच वर्षापासून नादुरूस्त आहे. परिणामी या परिसरात झालेल्या भूकंपाची नोंद येथे होऊ शकत नाही. त्यामुळे भूकंपाचा केंद्र बिंदू निश्चित करण्यात अडथळा येतो. हे यंत्र दुरूस्त करण्यास अथवा नवे डिजिटल यंत्र बसविण्यास संबंधित अधिकाऱ्यांची उदासिनता दिसून येते.








