पिण्याचे स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी केल्या सूचना
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील नविलतीर्थ जलाशयातून रामदुर्ग तालुक्यातील अवरादीपर्यंतच्या बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेसाठी उभारण्यात आलेल्या पाणीशुद्धीकरण प्रकल्पाला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जॅकवेल उभारण्यासाठी आवश्यक जागेचीही त्यांनी पाहणी केली. अवरादी बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेचे शुद्धीकरण प्रकल्प व जॅकवेलची कामे उत्तम दर्जाची असावीत. नियोजित वेळेत कामे पूर्ण करावीत, कोणत्याही परिस्थितीत कामांचा दर्जा राखावा, अशा सूचनाही राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. सौंदत्ती येथील पिण्याचे पाणी तपासण्यासाठीच्या प्रयोगशाळेला भेट देऊन सातत्याने पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी. जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. बैलहोंगल तालुक्यातील उडकेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन राहुल शिंदे यांनी तेथील व्यवस्थेसंदर्भात रुग्णांशी चर्चा केली. आरोग्य केंद्राच्या आत व परिसरात स्वच्छता राखावी, रुग्णावर तातडीने उपचार करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यातील अधिकारी यशवंत कुमार, सुभाष संपगावी, शशिकांत नायक, आर. बी. रक्कसगी, बी. बी. अय्यनगौडर, किरण घोरपडे आदी उपस्थित होते.









