प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश
कोल्हापूर : गोकुळने सभासदांना दिलेले जाजम आणि घड्याळ खरेदीची चौकशी होणार आहे. प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पुणे यांच्याकडून सांगलीचे विशेष लेखा परीक्षक सदाशिव गोसावी यांना तसे पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय पवार यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती. गोकुळने 6 हजार 500 दूध उत्पादक सभासदांना जाजम आणि घड्याळ दिले होते. हे जाजम आणि घड्याळ कशाच्या आधारावर दिले. याची किंमत कशी ठरवली.
या खरेदीचे जाहीर टेंडर प्रसिध्द का केले नाही, अशी विचारणा शिवसेनेचे संजय पवार यांनी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना केली होती. गोडबोले यांनी 15 ऑगस्ट रोजी खुलासा देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा दिला नाही.
त्यांनी कोटेशनद्वारे खरेदीचा अधिकार संचालक मंडळाचा आहे असे तोंडी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार यांनी पुणे येथील प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. सहकारी संस्था (दुग्ध) पुणे यांनी चौकशीचे आदेश दिले.
पशुखाद्य घोटाळा, गोवा सहलीच्या चौकशीचीही मागणी
पशुखाद्य घोटाळा व सहकुटुंब गोवा सहलीसाठी खर्च केलेल्या लाखो रुपयांची सुद्धा चौकशी करण्याची मागणीही संजय पवार यांनी केली आहे.
दूध उत्पादकांची फसवणूक होऊ नये
“कष्टकरी दूध उत्पादकांची फसवणूक होऊ नये, ही अपेक्षा. त्यांचे घामाचे पैसे सत्तेचा दुरुपयोग करून काहीजण बेकायदेशीररित्या उधळत आहेत. अशा लोकांकडून पैसे वसूल करून कारवाई झाली पाहिजे. जबाबदार कार्यकारी संचालक, ऑडिटर यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत.”
– संजय पवार, शिवसेना नेते (उबाठा)








