वृत्तसंस्था/ रायपूर
24 जानेवारीपासून मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात मुंबई संघात सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालचे पुनरागमन झाले आहे.
रणजी स्पर्धेतील गेल्या दोन सामन्यात प्रकृती नादुरुस्तीमुळे जैस्वाल मुंबई संघातून खेळू शकला नव्हता. महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या निवड समितीने जैस्वालची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेतली. त्याचप्रमाणे मुंबई संघाच्या डॉक्टरांनी त्याला या आगामी सामन्यात खेळण्यास परवानगी दिली आहे. आता महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात जैस्वाल आणि सक्सेना ही मुंबईची सलामीची जोडी राहिल. दिव्यांश सक्सेनाचे रणजी स्पर्धेतील पदार्पण आहे. मुशीर खानच्या जागी सक्सेनाला संधी देण्यात आली आहे. मुंबई संघातील सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ याची न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने तो रणजी स्पर्धेतील सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही. रणजी स्पर्धेच्या यापूर्वी झालेल्या लिग सामन्यात दिल्लीने मुंबईचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव केला होता. मुंबई संघाने या स्पर्धेत सहा सामन्यातून 23 गुण मिळवले आहेत. आता महाराष्ट्र विरुद्धच्या आगामी सामन्यात त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे जरुरीचे आहे. या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना हा विजय मोलाचा ठरू शकेल. अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.









