नेपाळला 23 धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश
वृत्तसंस्था/ हाँगझोऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या टी-20 क्रिकेट प्रकारामध्ये मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने नेपाळला 23 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात दुबळ्या नेपाळने भारतीय संघाला कडवी लढत दिली. माँटी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ संघाने बलाढ्या भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 4 बाद 202 धावा जमविल्या. त्यानंतर नेपाळने 20 षटकात 9 बाद 179 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हार पत्करावी लागली.
भारताच्या डावामध्ये जैस्वालने 49 चेंडूत शतक झळकविले. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात भारतातर्फे शतक नोंदविणारा जैस्वाल आज सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. भारतीय संघाला माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 23 चेंडूत 25, शिवम दुबेने 19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 25 धावा फटकावल्या. भारताच्या डावामध्ये एकूण 12 षटकार नोंदविले गेले. तर नेपाळनेही आपल्या डावामध्ये 14 षटकार ठोकले. जैस्वालने आपल्या खेळीमध्ये 7 षटकार आणि 8 चौकार नोंदवले. जैस्वालने एकेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले. भारतीय संघातील रिंकू सिंगने 15 चेंडूत नाबाद 37 धावा झोडपल्या. त्यांनी डावातील शेवटच्या षटकात 20 धावा घेतल्या. नेपाळतर्फे संदीप लामिछने आणि दीपेंद्र सिंग एwरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल करताना नेपाळच्या डावामध्ये दीपेंद्र सिंगने 15 चेंडूत 32 धावा तडकावल्या. भारतातर्फे रवि बिश्नोईने 24 धावात 3 तर आवेश खानने 32 धावात 3 गडी बाद केले. अर्शदीप सिंगने 2, साई किशोरने 25 धावात 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 4 बाद 202 (जैस्वाल 49 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकरांसह 100, रिंकू सिंग 15 चेंडूत नाबाद 37, संदीप लामिछने 1-28, एwरी 1-31), नेपाळ 20 षटकात 9 बाद 179 (दीपेंद्र सिंग 15 चेंडूत 32, रवि बिश्नोई 3-24, आवेश खान 3-32, साई किशोर 1-25, अर्शदीप सिंग 2-43).
पाक उपांत्य फेरीत (03-आमिर जमाल : 16 चेंडूत 41 धावा)

अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा 68 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकात सर्वबाद 160 धावा जमविल्या. त्यानंतर हाँगकाँगचा डाव 18.5 षटकात 92 धावात आटोपला. पाकच्या डावामध्ये आमिर जमालने 16 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह 41 धावा, अराफत मिनहासने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 25, असिफ अलीने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 25, यूसुफने 21 चेंडूत 3 चौकारासह 21, नझीरने 2 षटकारासह 13, शहाने 1 षटकारासह 13 धावा केल्या. हाँगकाँगतर्फे आयुष शुक्लाने 49 धावात 4 तर मोहम्मद गझनफरने 26 धावात 3, अनास खानने 18 धावात 2 गडी बाद केल्या. प्रत्युत्तरादाखल करताना हाँगकाँगच्या डावात हयातने 27 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 29, एहसान खानने 1 चौकारासह नाबाद 15, निझकात खानने 2 चौकारासह 11, नियाज अलीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. पाकतर्फे खुशदील शहाने 3 तर मिनहास, सुफियान आणि आक्रम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्या.
संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात सर्वबाद 160, हाँगकाँग 18.5 षटकात सर्वबाद 92.









