वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात 7 ते 12 जून दरम्यान खेळविला जाणार आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड यापूर्वीच केली आहे. पण ऋतुराज गायकवाड 5 जूनपर्यंत उपलब्ध होणार नसल्यामुळे त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयने निवड केली आहे. आता तो लवकरच लंडनला प्रयाण करणार आहे.
या अंतिम सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यापूर्वीच घोषित केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सलामीला फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड याचा विवाह 3 जून रोजी होणार आहे. त्यामुळे तो 5 जूननंतर भारतीय संघात दाखल होणार असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जैस्वालची फलंदाजी चांगलीच बहरली असून त्याने 14 डावात 625 धावा जमविल्या आहेत. जैस्वालने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकविली आहेत. 21 वर्षीय जैस्वाल भारतीय संघात पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जैस्वालने 15 सामन्यात 80.21 धावांच्या सरासरीने 1845 धावा जमविल्या असून त्यामध्ये 9 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 2022 -23 च्या रणजी हंगामात जैस्वालने 5 सामन्यात 315 धावा जमविताना 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकविली आहेत. तसेच त्याने इराणी करंडक सामन्यात पहिल्या डावात 213 तर दुसऱ्या डावात 144 अशा एकूण 357 धावा शेष भारत संघाविरुद्ध नोंदवून निवड समितीचे लक्ष स्वत:कडे वेधले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू तुकडी-तुकडीने पाठविले जात आहेत. विराट कोहली यापूर्वीच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत 2021 साली भारताने उपविजेतेपद मिळविले होते. न्यूझीलंडने त्यावेळी अजिंक्यपद मिळविले होते.
भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, के. एस. भरत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनादकट आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ : कमिन्स (कर्णधार), स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वॉजा, हेड, लाबुशेन, रेनशॉ, हॅरीस, कॅरे, इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, बोलँड, हॅझलहूड, लायन, स्टार्क आणि मर्फी.









