विंडीजविरुद्ध पहिली कसोटी, तिसरा दिवस : पहिल्या डावात भारताची विंडीजवर 271 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ रॉसो, डॉमिनिका
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारताने विंडीजवर वर्चस्व कायम राखत दिवसअखेर 113 षटकांत 2 बाद 312 धावा जमवित 162 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वालचे पदार्पणातच नाबाद शतक आणि कर्णधार रोहित शर्माचे शतक ही भारतीय डावाची वैशिष्ट्यो होती. सर्वाचे लक्ष वेधून घेणारा जैस्वाल हा पदार्पणातच शतक नोंदवणारा भारताचा 17 वा फलंदाज बनला असून त्याने रोहितसमवेत विंडीजविरुद्ध 229 धावांची विक्रमी सलामीची भागीदारीही केली.

रोहित शर्माने नेहमीच्या आक्रमक खेळाला मुरड घालत दहावे कसोटी शतक (221 चेंडूत 102) तर जैस्वालने 350 चेंडूत नाबाद 143 धावांची खेळी केली. भारताने सावध खेळ करीत दिवसभरात 90 षटकांत 232 धावांची भर घातली. तरीही विंडीजवर दीडशतकी आघाडी घेण्यास ती पुरेशी ठरली. दुसरा दिवस पूर्णवेळ फलंदाजी करणाऱ्या जैस्वालला विराट कोहली 96 चेंडूत 36 धावांवर साथ देत होता आणि दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 72 धावांची भागीदारी केली होती. त्याआधी शुबमन गिल केवळ 6 धावा काढून बाद झाला होता. 21 वर्षीय जैस्वाल व 36 वर्षीय रोहित शर्मा दोघेही आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. पण मुंबईची ‘खडूस’ वृत्ती या दोन्ही मुंबईकरांनी आपल्या फलंदाजीत दाखवून दिली.
जैस्वालने शतक पूर्ण करण्यासाठी 215 चेंडू घेतले तर रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी 220 चेंडू घेतले.
तब्बल 21 वर्षांनंतर मुंबईचे दोन फलंदाज सलामीला खेळताना दिसत आहेत. यापूर्वी 1982 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईच्या सुनील गावसकर व सुरू नायक यांनी भारतीय डावाची सुरुवात केली होती. जैस्वाल व रोहित यांनी विंडीजविरुद्ध आजवरची सर्वोत्तम सलामी देताना 229 धावा जमवित 2001 मध्ये संजर बांगर व सेहवाग यांनी नोंदवलेला 201 धावांचा विक्रम मागे टाकला.
विंडसर पार्कची खेळपट्टी दुहेरी स्वभावाची असून काही वेळा चेंडू पकडून ठेवले जात होते तर काही चेंडू टर्नही होत होते. अशा खेळपट्टीवर जलद धावा करणे कठीण असते. पण टिकून राहिल्यास धावा होऊ शकतात, हेच या दोघांनी दाखवून दिले. दोघांनी बचावात्मक खेळाचे उत्तम प्रदर्शन करीत खराब चेंडूची प्रतीक्षा करण्याचे धोरण ठेवले होते. विंडीजचे गोलंदाजही तितकेचे भेदक वाटत नव्हते.

बॅकवर्ड स्क्वेअरलेगला स्वीपचा फटका मारत एक धाव घेऊन शतक पूर्ण केल्यानंतर जैस्वालने जोरदार आरोळी ठोकत ड्रेसिंगरूमच्या दिशेने झुकून अभिवादन केले. शतकी खेळीत त्याने 14 चौकार मारले. अर्धशतक पूर्ण करताना त्याने अल्झारी जोसेफला मारलेला पुलचा चौकार हा त्याचा सर्वोत्तम फटका ठरला. मात्र दिवसातील सर्वोत्तम फटका मारला तो रोहितने. डीप मिडविकेटच्या दिशेने त्याने जोसेफला फ्लिकचा उत्कृष्ट षटकार मारला. नंतर त्याने स्पिनर जोमेल वॉरिकनलाही
बॅकफूट स्क्वेअरकटचा इफर्टलेस षटकार मारला.
भारताने पहिल्या सत्रात 66, दुसऱ्या सत्रात 99 तर तिसऱ्या सत्रात 67 धावा जमविल्या. खेळपट्टी इतकी संथ होती की, जैस्वालने एकदा कोहलीला, ‘जोरसे मार रहा हूं. जा ही नही रहा,’ असे म्हटल्याचे स्टंप मायक्रोफोनमधून ऐकू आले. पदार्पणात शतक नोंदवणारे फलंदाज काही अपवाद वगळता पुढे चमकले नाहीत, असे याआधी दिसून आले आहे. ही परंपरा मोडण्यात जैस्वाल नक्कीच यशस्वी ठरेल, अशी आशा वाटते.
संक्षिप्त धावफलक :
विंडीज प. डाव सर्व बाद 150, भारत प.डाव 113 षटकांत 2 बाद 312 : जैस्वाल खेळत आहे 14 चौकारांसह 143, रोहित शर्मा 20 चौकार, 2 षटकारांसह 103, गिल 11 चेंडूत 6, कोहली खेळत आहे 96 चेंडूत 36, अवांतर 24.
गोलंदाजी : वॉरिकन 1-82, अॅलिक अॅथनेझ 1-33.
(धावफलक दुसऱ्या दिवसाअखेरपर्यंत)
पदार्पणात शतक झळकावणारा 17 वा भारतीय फलंदाज
21 वर्षीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणातच शतक ठोकून इतिहास रचला. खरे तर फार कमी भारतीय खेळाडूंनी भारताबाहेर पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आता त्या यादीत यशस्वी जैस्वालचेही नाव जोडले गेले आहे. आतापर्यंत पदार्पणात 16 भारतीय फलंदाजांनी शतक झळकावले आहे. यामध्ये 17 वा खेळाडू म्हणून जैस्वालचे नाव जोडले गेले आहे.
- 1933 मध्ये लाला अमरनाथ 118 धावा,
- 1952 मध्ये दीपक शोधन 110 धावा,
- 1955 मध्ये कृपाल सिंग 100 धावा,
- 1959 मध्ये अब्बास अली बेग 112 धावा,
- 1964 मध्ये हनुमंत सिंग 105 धावा,
- 1969 मध्ये गुंडाप्पा विश्वनाथ 137 धावा
- 1976 मध्ये सुरिंदर अमरनाथ 124 धावा,
- 1984 मध्ये मोहम्मद अझरुद्दिन 110 धावा,
- 1992 मध्ये प्रविण आमरे 103 धावा,
- 1996 मध्ये सौरभ गांगुली 131 धावा,
- 2001 मध्ये वीरेंद्र सेहवाग 105 धावा,
- 2010 मध्ये सुरेश रैना 120 धावा,
- 2013 मध्ये शिखर धवन 187 धावा,
- 2013 मध्ये रोहित शर्मा 177 धावा,
- 2018 मध्ये पृथ्वी शॉ 134 धावा,
- 2021 मध्ये श्रेयस अय्यर 105 धावा,
- 2023 मध्ये यशस्वी जैस्वाल 171.
परदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर
परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये 1974 मध्ये 77 धावा केल्या होत्या. तर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या डावात 65 धावा केल्या. यशस्वीने सर्वांना मागे टाकले आहे. 2013 मध्ये शिखर धवन (187 धावा) आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉ (134 धावा) यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली आहेत पण ही शतके मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेतील आहेत.
यशस्वी पदार्पणात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा खेळाडू
विंडीजविरुद्ध जैस्वालने दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत 350 चेंडूंचा सामना केला. जो कसोटी पदार्पणाच्या एका डावात भारताकडून सर्वाधिक आहे. हा विक्रम यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. 1984 मध्ये अझरुद्दिनने ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्धच्या 110 धावांच्या खेळीत केला होता. त्यावेळी त्याने 322 चेंडूंचा सामना केला होता. या यादीत सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी असून त्याने 1996 मध्ये 301 चेंडूत 131 धावा केल्या होत्या.
यशस्वी-रोहितने 21 वर्षे जुना विक्रम मोडला
रोहित आणि यशस्वी यांनी भागीदारीचाही नवा विक्रम केला आहे. दोघांनी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या सामन्यात रोहित आणि यशस्वी यांनी 229 धावांची सलामी दिली. या जोडीने वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांचा विक्रम मोडला आहे. सेहवाग-बांगर जोडीने 2002 मध्ये मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध 201 धावांची सलामी दिली होती.
80 चेंडू खेळल्यानंतर विराटला चौकार मारण्यात यश, शतकाप्रमाणे केला जल्लोष
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात संयमी खेळी करताना दिसला असून त्याला पहिला चौकार मारण्यासाठी तब्बल 80 चेंडू वाट पाहावी लागली. डावातील पहिला चौकार मारल्यानंतर विराटची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाला रोहित आणि यशस्वी यांनी चांगली सुरुवात दिली. सलामीसाठी आलेल्या या दोघांनी वैयक्तिक शतके केली. तिसऱ्या क्रमांकावरील शुबमन गिल मात्र अवघ्या 6 धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली आक्रमक खेळी करेल असा अंदाज होता. मात्र, विराट कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक अशी संयमी खेळी करताना दिसला. डावातील पहिल्या 80 चेंडूत त्याला एकही चौकार मारता आली आहे. डावातील 81 व्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर विराट जल्लोषाच्या मूडमध्ये दिसून आला. डावातील पहिला चौकार मारण्यासाठी विराटला यापूर्वी इतका वेळ बहुतेक कधीच लागला नसावा. अशात हा चौकार मारल्यानंतर विराटही आनंदात होता. त्याने चौकाराचा आनंद अगदी अर्धशतक किंवा शतकाप्रमाणे केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले.
कसोटीत सर्वाधिक धावा जमवणाऱ्यांच्या यादीत विराट पाचवा
विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विराटने खास विक्रम रचला. टीम इंडियाकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्याने माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकत ही कामगिरी केली. विराटने कसोटी कारकीर्दीत विंडीजविरुद्धच्या सामन्यापर्यंत 8515 धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर त्याच्या नावावर 15921 धावा आहेत. तो कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
15921 सचिन तेंडुलकर
13265 राहुल द्रविड
10122 सुनील गावसकर
8781 व्हीव्हीएस लक्ष्मण
8515 विराट कोहली
8503 वीरेंद्र सेहवाग
पदार्पणात शतक झळकावणारा चौथा युवा भारतीय
विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना युवा भारतीय खेळाडू यशस्वी जैस्वालने अनेक विक्रमांची नोंद केली. यामध्ये पदार्पणात कमी वयात शतक झळकावणारा तो चौथा युवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी पृथ्वी शॉ, अब्बास अली बेग, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहम्मद अझरुद्दिन यांनी अशी कामगिरी साकारली आहे.
- 18 वर्षे 329 दिवस पृथ्वी शॉ वि. वेस्ट इंडिज, राजकोट, 2018
- 20 वर्षे 126 दिवस अब्बास अली बेग वि. इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड, 1959
- 20 वर्षे 276 दिवस गुंडाप्पा विश्वनाथ वि. ऑस्ट्रेलिया, कानपूर, 1969
- 21 वर्षे 196 दिवस यशस्वी जैस्वाल वि. वेस्ट इंडिज, रॉसिओ, 2023
- 21 वर्षे 327 दिवस मोहम्मद अझरुद्दीन वि. इंग्लंड, कोलकाता, 1984









