राजस्थान रॉयल्स-चेन्नई सुपरकिंग्ज आज आमनेसामने
वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. राजस्थान संघातील सलामीची जोडी जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची फलंदाजी चांगलीच बहरली असल्याने त्यांची चेन्नईच्या फिरकीला असलेल्या चेपॉक खेळपट्टीवर सत्त्वपरीक्षा राहिल.
चेन्नईची खेळपट्टी आतापर्यंत फिरकीला अनुकूल असल्याचे दिसून येते. या खेळपट्टीवर यापूर्वी भारताचे अनेक फिरकी गोलंदाजांनी आपली करामत दाखवत संघाला विजय मिळवून दिला आहे. टी-20 या अतिजलद क्रिकेटच्या प्रकारामध्ये गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजी अधिक प्रभावी ठरत आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाची सलामीची जोडी यशस्वी जैस्वाल आणि इंग्लंडचा वनडे संघाचा कर्णधार व सलामीचा फलंदाज जोस बटलर यांनी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी दोन अर्धशतके झळकवली आहेत. बटलरचा स्ट्राईक रेट 180.95 तर जैस्वालचा स्ट्राईक रेट 164.47 असा आहे. राजस्थानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने गौहत्तीमध्ये झाले होते आणि गौहत्तीची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल ठरली होती. तसेच हैद्राबादची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देत असल्याचे दिसून आले आहे. आता राजस्थान रॉयल्स संघाचा सामना चेन्नईमध्ये बुधवारी पहिल्यांदा होत आहे. चेन्नईची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजीला अनुकूल ठरते पण त्यानंतर ती फिरकीला साथ देत असल्याचे दिसून येते. चेन्नईच्या खेळपट्टीवर 170 ते 175 धावसंख्येशी पाठलाग करताना दुसऱ्या संघांना झगडावे लागते. चेपॉकच्या या मैदानावर चेन्नई संघातील फिरकी गोलंदाज मोईन अली, रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटेनर यांची कामगिरी दर्जेदार होईल अशी अपेक्षा आहे. चेन्नईच्या या फिरकी गोलंदाजांसमोर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची सत्त्वपरीक्षा ठरेल. बुधवारच्या सामन्यात चेन्नईचे हे तीन फिरकी गोलंदाज किमान 10 तर कमाल 12 षटके टाकतील असा अंदाज आहे. चेन्नईच्या या तीन फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत या स्पर्धेत झालेल्या तीन सामन्यामध्ये एकूण 11 गडी बाद केले आहेत. मोईन अलीने 2 सामन्यामध्ये किफायतशील गोलंदाजी करताना 6.50 इकॉनॉमी रेट राखला होता तर जडेजा 6.88 तसेच सँटेनरने 6.75 असा रेट ठेवला होता. मोईन अलीला प्रकृती नारुदुस्तीमुळे चेन्नईचा शेवटचा सामना हुकला होता. मात्र तो बुधवारच्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे. मगालाच्या जागी मोईन अलीला खेळवले जाईल. बेन स्टोक्स हा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याची जागा प्रेटोरियस घेईल अशी शक्यता आहे. भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चेन्नईच्या याच खेळपट्टीवर आतापर्यंत अधिक गोलंदाजी केली असून त्याला बुधवारच्या सामन्यात यजुवेंद्र चहलकडून बऱ्यापैकी साथ मिळेल. राजस्थान संघातील रविचंद्र अश्विन यजुवेंद्र चहल आणि मुरगन अश्विन या फिरकी त्रिकुटासमोर चेन्नईच्या फलंदाजांना जागरुक रहावे लागेल. चेन्नई संघातील अनुभवी अजिंक्य रहाणेला फलंदाजीचा सूर बऱ्यापैकी मिळाला आहे. ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेतील सामन्यात आपल्या फलंदाजीत सातत्य राखले असल्याने बुधवारच्या सामन्यात तो पुन्हा चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला वेगवान गोलंदाज दीपक चहरची गैरहजेरी जाणवेल. दुखापतीमुळे दीपक चहर या संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही. चेन्नईच्या फलंदाजीची बाजू तसेच राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची स्थिती जवळपास समतोल असल्याने बुधवारचा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल. चेपॉकच्या या खेळपट्टीवर राजस्थानला विजयासाठी अधिक झगडावे लागेल. हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने चेन्नईला त्याचा अधिक लाभ मिळू शकेल.
चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी (कर्णधार), कॉनवे, रुतुराज गायकवाड, रायुडू, मोईन अली, स्टोक्स, जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अभय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटेनर, शुभाम्शू सेनापती, सिमरजीत सिंग, पथिराना, थीक्षना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जैस्वाल, अब्दुल बसीत, एम. अश्विन, रविचंद्रन अश्विन, असिफ, बोल्ट, बटलर, करिअप्पा, चहल, डी. फरेरा, हेतमेयर, होल्डर, जुरेल, मॅकॉय, देवदत्त पडिकल, रियान पराग, कुणालसिंग राठोड, रुट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव आणि झम्पा.
सामन्याची वेळ सायंकाळी 7.30 वाजता









