क्वाड विदेश मंत्र्यांच्या बैठकीसाठी टोकियोच्या दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ टोकियो
विदेशमंत्री एस. जयशंकर हे क्वाड विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी रविवारी दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त टोकियो येथे पोहोचले. भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी जयशंकर यांचे जपानमध्ये स्वागत केले आहे. जपानमध्ये भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
29 जुलै रोजी क्वाड विदेश मंत्र्यांची बैठक होणार आहे. यात अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे विदेशमंत्री सामील होणार आहेत. ही बैठक चालू वर्षाच्या प्रारंभी हिरोशिमा येथे आयोजित राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद आणि त्यानंतर न्यूयॉर्क झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
जयशंकर आणि अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांची रविवारी भेट झाली. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय तसेच जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी टोकियोमध्ये क्वाड विदेश मंत्र्यांच्या बैठकीच्या व्यतिरिक्त भेट घेतली आहे.
जयशंकर यांनी या बैठकीची छायाचित्रे शेअर केली आहेत. टोकियोमध्ये ब्लिंकेन यांना भेटून अत्यंत चांगले वाटले. आमचा द्विपक्षीय अजेंडा सातत्याने पुढे जात आहे. क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही व्यापक चर्चा झाली. क्वाडच्या सोमवारी होणाऱ्या एफएमएममध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने क्वाडच्या स्थापनेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित प्रस्तावाला आकार दिला होता. भारत-प्रशांत क्षेत्रात महत्त्वपूर्ण सागरी मार्गांना कुणाच्याही प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी एक नवी रणनीति विकसित करण्यावर या समुहाचा भर राहिला आहे. दक्षिण चीन समुद्र हा प्रशांत आणि हिंदी महासागरादरम्यान जंक्शनवर स्थित आहे. चीन दक्षिण चीन समुद्राच्या बहुतांश हिस्स्यावर दावा करत आहे. तर फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान देखील या सागरी क्षेत्रावर दावा करत आहे.









