भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यावर भर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेलेले भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, तंत्रज्ञान आदानप्रदान, गुंतवणूक, व्यापार, भारत-प्रशांतीय क्षेत्रातील मुक्त संचार आदी विषयांवर विचारविमर्ष केला. अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दाही चर्चिला गेला, असे स्पष्ट करण्यात आले.
भारताशी सुदृढ आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे धोरण आहे. अनेक क्षेत्रांमध्ये या दोन्ही देशांची भक्कम भागीदारी आहे. ती अधिक दृढ व्हावी, अशी अध्यक्ष ट्रम्प यांची इच्छा आहे, असे या चर्चेत रुबिओ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. साधारणत: 18 हजार भारतीय नागरिक आज अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहत आहेत. त्यांच्यासंबंधीही भारताशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असेही प्रतिपादन रुबिओ यांनी केले. या बेकायदा अमेरिकेत गेलेल्या नागरिकांना भारत सरकार परत घेणार का, या प्रश्नावरही चर्चा झाल्याचे समजते.
विविध विषयांवर चर्चा
जागतिक मुद्दे, विभागीय मुद्दे, भारत-प्रशांतीय क्षेत्रातील मुक्त संचार आणि शांतता, भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य, महत्वाची आणि उगवती तंत्रज्ञाने तसेच त्यांचे आदानप्रदान, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आदी अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांनी बोलणी केली आहेत. ही बोलणी सकारात्मक आणि दिशादर्शक अशी झाली आहेत. ट्रम्प प्रशासनाची भारताशी संबंध अधिक भक्कम करण्याची इच्छा या चर्चेतून स्पष्ट झाली आहे, अशी माहिती चर्चेनंतर देण्यात आली आहे.
पहिलीच भेट भारतीय नेत्याशी
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री या नात्याने मार्को रुबिओ यांची ही अन्य कोणत्याही देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्याशी पहिलीच भेट होती. ती त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची घेतली. या घटनेतून अनेक संदेश दिले गेले आहेत, जे भारतासाठी सकारात्मक आहेत. दोन्ही नेत्यांनी आतापर्यंतच्या काळात घडलेल्या दोन्ही देशांच्या भागीदारीच्या संदर्भातील घटनांचा आढावाही या चर्चेत घेतला. स्वत: रुबिओ भारताशी दृढ संबंधांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि रुबिओ यांच्या नेतृत्वाच्या काळात दोन्ही देश एकमेकांचा आणखी जवळ येतील, असे प्रतिपादन जयशंकर यांनी नंतर ‘एक्स’ या माध्यमावर संदेश पोस्ट करुन केले.
अन्य नेत्यांशीही चर्चा
रुबिओ यांनी जयंशकर, तसेच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री पेनी वाँग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री ताकेशी इवाया यांच्याशीही संयुक्त चर्चा केली. हे चारही देश क्वाड या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेची शिखर बैठक भारतात एप्रिलमध्ये होणार आहे. या बैठकीची तयारी करण्यासाठी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे या बैठकीत या चारही नेत्यांनी ठरविले आहे.
भारताविषयी धोरणासंबंधी उत्सुकता
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांना निवड झाली आहे. शपथग्रहण झाल्यानंतर ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. अशा स्थितीत त्यांचे भारतासंबंधीचे धोरण काय असणार, ते पूर्वीप्रमाणेच राहणार की त्यात काही परिवर्तन होणार, याविषयी भारताच्या राजकीय वर्तुळात सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांचे घनिष्ट व्यक्तिगत संबंध आहेत. या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचे मापन केले जात आहे. ट्रम्प यांनी भारतासंबंधीचे त्यांचे धोरण सकारात्मक असेल, असे संकेत दिले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात हे संबंध व्यावहारिकदृष्ट्या कसे साकारले जातात, हे स्पष्ट होणार आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
चर्चा समाधानकारक
ड जयशंकर आणि रुबिओ यांच्यातील चर्चा समाधानकारक झाल्याची माहिती
ड संरक्षण संबंधांवर दोन्ही देश भर देण्याची शक्यता, ऊर्जाक्षेत्रही आघाडीवर
ड भारताची संबंध अधिक दृढ करण्याचे ट्रम्प यांचे संकेत, भारताचा प्रतिसाद









