द्विपक्षीय संबंधांना देणार बळकटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर हे 21 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत चार देशांच्या दौऱयावर असणार आहेत. नव्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी विदेशमंत्री जयशंकर हे गुयाना, पनामा, कोलंबिया आणि डॉमिनिकन प्रजासत्ताक या देशांच्या दौऱयावर जाणार आहेत. दक्षिण अमेरिकन अन् कॅरेबियन देशांसाठी विदेशमंत्री म्हणून जयशंकर यांचा हा पहिलाच दौरा ठरेल.
गुयाना दौऱयादरम्यान तेथील विदेशमंत्री ह्यूग हिल्टन टॉड यांच्याशी जयशंकर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. विदेशमंत्रालयाने बुधवारी दौऱयाची घोषणा करताना जयशंकर हे गुयानाच्या नेतृत्वाची भेट घेण्यासह अनेक मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
विदेशमंत्री जयशंकर हे 24-25 एप्रिलदरम्यान पनामा तर 25-27 एप्रिलपर्यंत कोलंबिया दौऱयावर असणार आहेत. दौऱयाच्या अखेरच्या टप्प्यात ते डॉमिनिकन प्रजासत्ताक या देशात पोहोचतील. दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांसोबत उच्चस्तरीय संपर्क राखणे आणि विशेषकरून महामारीनंतरच्या स्थितीत सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा शोध घेण्याची संधी प्रदान करणारा हा दौरा असल्याच्s विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.









