वृत्तसंस्था / दोहा
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल्-खालेद अल-सबाह यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि इतर मुद्यांवर चर्चा केली आहे. ते कुवेतच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर तेथे गेले आहेत. ही चर्चा रविवारी कुवेत शहरात झाली. जयशंकर यांचे रविवारी सकाळी या देशात आगमन झाले होते.
कुवेतचे विदेश व्यवहार मंत्री अबुल्ला अली अल् याह्या यांनी त्यांचे स्वागत केले. कुवेतच्या राजपुत्रांशी चर्चा करताना जयशंकर यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेश त्यांना दिला. भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्याच्या संबंधात हा दौरा होता. व्यापार, गुंतवणूक, उत्पादन, तेल पुरवठा इत्यादी संबंधांमध्ये त्यांनी चर्चा केली.
दुर्घटनेनंतर दोन महिन्यांनी…
दोन महिन्यांपूर्वी कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तेथे कामासाठी गेलेल्या 45 भारतीय कामगारांचा आणि अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोणत्याही महत्वाच्या भारतीय नेत्याची ही प्रथमच कुवेत भेट होती. ऊर्जा, सुरक्षा, सांस्कृतिक आदानप्रदान या विषयांवरही या दौऱ्यात बोलणी झाली.









