विदेश मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारतात हाय अलर्ट आहे. या पार्श्वभूमीवर विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढविण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. जयशंकर यांना आता बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे. दिल्लीत त्यांच्या निवासस्थानानजीक देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जयशंकर यांच्या ताफ्यात एक अतिरिकत बुलेटप्रूफ वाहन जोडुन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना यापूर्वीच झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली असून ती सीआरपीएफच्या कमांडोंकडून प्रदान केली जाते. जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी 33 कमांडोंची एक टीम 24 तास तैनात असते.
दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीत व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेवरून समीक्षा केली होती. बैठकीत पाकिस्तान विरोधात ठाम भूमिका घेतलेल्या नेत्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यावर चर्चा झाली.
विदेश सचिव विक्रम मिसरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भाजपच्या सुमारे 25 प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेची समीक्षा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यात केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा, भूपेंद्र यादव, खासदार निशिकांत दुबे, सुधांशु त्रिवेदी आणि वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी सामील आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जवळपास सर्व बैठकांमध्ये विदेशमंत्री जयशंकर सामील होत राहिले अहेत. त्यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानच्या धोरणांच्या विरोधात सातत्याने वक्तव्यं केली आहेत.









