व्यापार, गुंतवणूक अन् ऊर्जासुरक्षेवर चर्चा
वृत्तसंस्था/ मस्कत
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ओमानचे विदेशमंत्री बद्र अलबुसैदी यांच्यासोबत व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यावर व्यापक चर्चा केली. जयशंकर हे आठव्या हिंदी महासागर संमेलनात भाग घेण्यासाठी ओमानची राजधानी मस्कत येथे पोहोचले आहेत. याचबरोबर जयशंकर यांनी परिषदेत सामील अन्य देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे.
ओमानचे विदेशमंत्री बद्र अलबुसैदी यांना भेटून आनंद झाला. 8 व्या हिंदी महासागर संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांचे कौतुक करतो. आम्ही व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेतील सहकार्यावर विस्तृत चर्चा केल्याचे जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत नमूद केले आहे.
बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि ओमानदरम्यान कूटनीतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक लोगोही जारी केला. तसेच एक पुस्तक ‘मांडवी टू मस्कत : भारतीय समुदाय आणि भारत-ओमानचा संयुक्त इतिहास’चे प्रकाशन करण्यात आले.
इराणच्या विदेश मंत्र्यांशी भेट
जयशंकर यांनी इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघजी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अन् क्षेत्राच्या विकासावर चर्चा केली. यानंतर ब्रुनेईचे विदेशमंत्री दातो एरवान पेहिन यूसोफ यांच्यासोबत चर्चा करत भारत-आशियान भागीदारीला आणखी मजबूत करण्यावर विचारांचे आदानप्रदान जयशंकर यांनी केले आहे.
भूतानसोबत द्विपक्षीय सहकार्य
भूतानचे विदेशमंत्री डी.एन. ढुंगयेल यांच्यासोबत जयशंकर यांनी द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यावर चर्चा केली. याचबरोबर श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची त्यांनी भेट घेतली आहे.
ताळमेळ राखण्याचे आवाहन
हिंदी महासागर ही जगाची जीवनरेषा असून क्षेत्रातील देशांनी परस्परांचे समर्थन करणे, शक्तींना परस्परांमध्ये जोडणे, विकास, संपर्क, सागरी अन् सुरक्षा उद्देशांना पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याचे आवाहन जयशंकर यांनी केले आहे.









