जी-20 बैठकीपूर्वी काश्मीरमध्ये एनआयएची कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 बैठकीपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका सदस्याला अटक केली. कुपवाडा जिह्यातील मोहम्मद उबैद मलिक असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो भारतीय सैनिक आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची गुप्त माहिती दहशतवादी संघटनेला देत होता. उबैदकडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली असून तो जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट राबवण्याचा प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सोमवार, 22 मे पासून जी-20 बैठक सुरू होत आहे. या बैठकीपूर्वी एक दिवस आधी एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली. उबैद पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद कमांडरच्या सतत संपर्कात होता. आरोपी पाकिस्तानस्थित कमांडरला विशेषत: सैन्य आणि सुरक्षा दलांच्या हालचालींबद्दल गुप्त माहिती देत असल्याचे तपासात दिसून आले.
हल्ल्याचे इनपुट, फुटीरतावादी ताब्यात
श्रीनगरमधील जी-20 कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी दहशतवादी काही मोठे हल्ले करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राजौरी आणि पूंछमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यांसारख्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आपली रणनीती बदलत आहे. या भागात यापूर्वी झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाच स्पेशल फोर्स कमांडोसह दहा लष्करी जवान हुतात्मा झाले होते. जी-20 बैठकीपूर्वी काश्मीरच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने संशयित आणि फुटीरतावाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे.









